यवतमाळ : जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांचं पांढरं सोनं विक्री अभावी घरात साठवून आहे. पणन महासंघाची खरेदी अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. अशावेळी खरीप हंगाम अगदी 14 दिवस समोर असताना नियोजन कसे करायचे असा प्रश्न हजारो कष्टकरी शेतकऱ्यांना पडलाय. ऑनलाइन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा कापूस घरात आहे. नोंदणी न  केलेल्याही शेतकऱ्यांचाही कापूस विक्री अभावी घरात आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कापसाची प्रातिनिधिक स्वरूपात होळी करून आंदोलन केले.


शेतकऱ्यांना पांढऱ्या सोन्याचा काळाधूर का करावा लागला?


सुरुवातीला कापूस खरेदीच्या वेळी 3 ते 4 दिवस रात्री जागली करत बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी नंबर लावावा लागला. दरम्यान कोरोनाचे संकट आले. कापूस खरेदी जवळपास दीड महिना बंद होती. दररोज केवळ दहा शेतकऱ्यांच्या गाड्या घेऊन खरेदी सुरू झाली. लाखो शेतकरी प्रतीक्षेत राहिले. त्यात आता 10 गाड्याची मर्यादा 40 वर आली. तरीही कापूस उत्पादक हजारो असल्याने त्यांचा नंबर केव्हा लागेल ही चिंता आजही कायम आहे. सद्यस्थितीत घरात विक्री अभावी कापूस आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. आता यावेळी शेतकऱ्यांचं पांढरं सोनं पणनच्या माध्यमातून शासनाने जास्तीत जास्त खरेदी करावं, अशी मागणी घेऊन शेतकऱ्यांनी अनेकदा निवेदने दिले. वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाची भूमिका सुध्दा शेतकरी संघटनेने घेतली आणि ही कापूसकोंडी सोडवावी अशी मागणी प्रशासनाला केली.



दरम्यान पहिल्या टप्प्यात प्रथम तीन दिवस संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यातून पणन मंत्री, अधिकारी, सर्व पालकमंत्री ह्यांना फोन केले. सर्वांनी कापूस खरेदी संदर्भात आपल्या भावना व्यक्त केल्या.त्यानंतर "आम्ही मरावे किती" ह्या शीर्षकाखाली महिला शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या बहिणी ह्या नात्याने पत्र लिहून ती पत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना व्हाट्सअप्प आणि मेल केले. फोन लावला. मात्र, लागला नाही. त्यानंतर आता शेतकऱ्यांनी हताश होत कापसाची होळी करून आंदोलन केले.


शेतकऱ्यांच्या घरादारात सर्व ठिकाणी कापूस आहे. उन्हाळ्यात तर बाहेर चूल पेटवावी लागते. बाहेर झोपावे लागते. पावसाळ्यात तर घराच्या आत स्वयंपाक करावा लागेल. एक जरी ठिणगी घरात ठेवलेल्या कापसावर पडली तर? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. त्यामुळे माय भगिनी अंगणात स्वयंपाक करीत आहे. तर कुठं मातीच्या कवेलू खचलेल्या आणि टिनाच्या घरात, पसरीत शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला आहे. कापूस विक्री झाला नाही तर पुढचे शेतीचे नियोजन कसे करायचे असा प्रश्न यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पडलाय.



जगात कापसाचा शोध यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथे गृत्समद ऋषींनी लावला असे सांगितले जाते. त्याच कळंब तालुक्यातील मावळणी या गावांमध्ये आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस साठवून आहे. कुठं घराच्या छतावर साठवून तर कुठे एका पसरीत गाठोड्यात कापूस साठवून बांधून ठेवला आहे. कापूस ज्वलनशील त्याला लवकरच आग लागू शकते तर वादळ वाऱ्यात कवेलू, टिनाचे छत उडाले तर कापूस भिजून जाऊ शकतो. त्यामुळे कापूस केव्हा विक्री होईल याची शेतकऱ्यांना चिंता लागली आहे.


त्या शेतकऱ्यांच्या कापसाची वाताहात


मावळणी येथील शेतकरी उत्तम कांबळे यांनी आपल्या चार एकर क्षेत्रावर 20 क्विंटल कापूस पिकविला. ते अशाच  मातीच्या घरात राहतात. वादळात टिनाचे छत केंव्हाही उडून कापूस भिजण्याची शक्यता आहे. पूढं लोकांचे देणे, कर्जाची परतफेड आणि पुढचे नियोजन कसं करायचं हा प्रश्न या पोशिंद्याला पडलाय. त्यांची अवस्था तर बिकट आहे. रक्त आटवून पिकविलेला कापूस विकायचा कसा या विवंचनेत ते आहेत. त्यांच्याकडे कापूस आहे. मात्र, त्या शेतकरी बापाच्या अंगावरील चाळणी झालेले कपडे, त्याचं फाटकं आयुष्य दर्शवीतं. त्यांच्या घरात, पसरीत तर कुठं कापूस गाठोड्यामध्ये घराच्या कानाकोपऱ्यात असा 5 ते 6 महिन्यापासून साठवून आहे. कापूस ज्वलनशील त्यामुळे घरच्या आंगणात कित्येक दिवसापासून स्वयंपाक करणारी माय आणि वादळ वाऱ्यात छत उडू नये अन् कापूस भिजू नये म्हणून जागली करणारा शेतकरी बाप. अशी बिकट स्थिती या भागातील शेतकऱ्यांची झाली आहे.



तर याच गावातील शेतकरी महिला सुलोचना झाडे यांचे घर पावसाळ्यात खूप गळते. छताचे आभाळ फाटलं आहे. अन् ते शिवू कसं? अशी स्थिती त्यांची आहे. आता कसं करावं काय करावं घर खूप गळते. वाई ले पैसा नाही, बि-बियाण्याले पैसा नाही असे 4 एकर कोरडवाहू शेतात 20 क्विंटल कापूस पिकविलेल्या शेतकरी महिला सुलोचना झाडे यांचे म्हणणे आहे. अशात विक्री अभावी कापूस' जखमी' होऊ नये ही त्यांची अपेक्षा. त्यांच्या संपूर्ण घरात भांडे कमी अन् कापूस घरभर आहे. त्यात त्यांचे कवेलूचे छत जागोजागी खचले आहे. कापूस केव्हा विक्री होईल याची त्यांना चिंता सतावत आहे.



तर खुंटाळा येथील शेतकरी विनायक नायसे यांनी पणन महासंघाकडे लवकर कापूस विक्रीसाठी नंबर लावला. मात्र, त्यात हजारो नंबर म्हणून प्रतीक्विंटल 1200 रुपये तोटा सहन करून पुढील हंगामाच्या नियोजनसाठी नाईलाजाने कापूस खासगीमध्ये विकला. कापुस उत्पादन शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळेच आज राज्याच्या अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या गावात घरात साठवून असलेल्या कापसांपैकी मूठभर कापूस गावाच्या मध्यभागी आणून त्याच कापसाची प्रातीनिधिक होळी केली आणि सरकारचे कासवगतीने सुरू असलेल्या कापूस खरेदीबाबत लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. (केंद्रीय कपास निगम) CCI आणि पणन महासंघाने कापूस खरेदी सुरू केला आहे. मात्र, आजही हजारो शेतकऱ्यांच्या घरी कापूस शिल्लक आहे. कापूस विकायला गेलं तर कापसाची नोंदणी हजारो आकड्यात त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी नंबर लागत नाही. त्यामुळे शेतकरी नेत्यांनी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने यात तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी केली आहे.



पणन महासंघाच्या नियोजनानुसार यवतमाळ जिल्ह्यात कालपर्यंत 9 केंद्रावर 32 हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी केला आहे. आणखी 10 हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करायचा आहे. अशात ते फक्त रोज एका केंद्रावर 40 च्या पुढे गाड्या घेत नाही त्यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांचा कापूस पावसाळ्याच्या अगोदर खरेदी होईल काय? हा प्रश्न आहे. पावसाळ्यापूर्वी कापूस विक्री झाला नाही तर शेतकऱ्यांना नाईलाजाने खाजगीमध्ये कमी भावाने कापूस विक्री करावा लागू शकतो किंवा काही शेतकऱ्यांना त्यांचा कापूस घरातच ठेवावा लागू शकतो. अशात कापूस घरात ठेवण्यासाठी व्यवस्था शेतकऱ्यांकडे नाही. त्यात कापूस लागला तर पुन्हा नुकसान होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढे 14 दिवसांवर असलेल्या खरिपाचं नियोजन कसं करायचं असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर आहे.



शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस विक्री झाला नाही. तर शेतकरी रस्त्यावर उतरतील. त्यामुळे खरेदी केंद्र वाढविण्याची गरज पणन महासंघ आणि CCI (भारतीय कपास निगम)ला सुद्धा आहे, असे कळंब भागातील शेतकरी नेते प्रवीण देशमुख यांचे म्हणणं आहे. कापूस नोंदणी केलेल्या दहा हजाराच्या पेक्षा जास्त आणि नोंदणी न केलेल्या आणखी हजारो शेतकऱ्यांचा कापूस त्यांच्याकडे घरी शिल्लक आहे. त्याचे कुठं नियोजन करावे, कसा कापूस कुठं विक्री करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाचा प्रश्न घेत कापूस खरेदीची गती वाढविण्याची गरज आहे, असं पत्र राळेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने जिल्हाधिकारी आणि केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री यांना दिले आहे. शेतकऱ्यांचा पुढील हंगाम मोजून 14 दिवसांवर आहे. मागील हंगामाचा कापूस घरात आहे. त्यामुळेच आज शेतकऱ्यांनी अनेक ठिकाणी आपापल्या घरातून मूठभर कापूस घेऊन येत गावागावात कापूसकोंडी सोडवण्यासाठी लॉकडाऊन काळात नियम पाळत कापसाची होळी करीत आंदोलन केले. त्याच शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याचा काळा धूर प्रशासनाला जाग करेल? शेवटच्या बोंडापर्यंत कापूस खरेदी करू म्हणणारी शासकीय तथा प्रशासकीय यंत्रणा 'त्या' सर्व शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करतील काय? असा प्रश्न पडलाय.


कापूस खरेदी होत नसल्याने शेतकरी आक्रमक; यवतमाळमधील इचोरी येथे शेतकऱ्यांकडून कापसाची होळी