मुंबई : राज्यामध्ये पहिल्यांदाच कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयातही अतिदक्षता विभागाची ('आय सी यू') व्यवस्था करण्यात येणार असल्याने त्यामुळे कोरोनाबाधित नातेवाईकाची होणारी अनाठायी धावपळ थांबण्यास मदत होणार आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे राज्यातील विशेषतः मुबंईतील आरोग्य व्यवस्थेवर ताण वाढत असतानाच महापालिकेने शहरातील विविध भागात तात्पुरते कोविड केअर सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकी 'वरळी डोम' या नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया येथे गेल्या 20 एप्रिल पासून उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या रुग्णालयात 30 खाटाचं अत्याधुनिक आय सी यू उभारण्यात येणार आहे. यामुळे रुग्णांना तात्काळ सुविधा उपलब्ध होऊ शकणार आहे, अशा स्वरूपाचं पहिलं रुग्णालय असून येथे कोविड बाधित रुग्णांसाठी ज्यांना किडनी विकारामुळे डायलेसिसची गरज यासाठी येथे सुविधा उपलब्ध असणार आहे.


गेल्या काही दिवसापासून मुंबई शहरातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे रुग्णांना रुग्णलयात दाखल करून घेण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करावे लागत आहे. अनेक रुग्णाच्या नातेवाईकाची ससेहोलपट थांबण्याकरिता शहरातील विविध भागात तात्पुरत्या केंद्राची निर्मिती करण्यात आली असून यामुळे हजारो बेड्स उपलब्ध करण्यात आले आहे. ही केंद्रे म्हणजे फक्त अलगीकरणाची व्यवस्था नसून ज्या पद्धतीने कोरोनाबाधित रुग्णालयात उपचार दिले जातात अगदी त्याप्रमाणे येथे व्यस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बहुतेक केंद्रात कोरोनाबाधितांना श्वसनाचा होणार त्रास लक्षात घेऊन कृत्रिम ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याशिवाय तज्ज्ञ डॉक्टरांची फौज साथीला परिचारिका, वैद्यकीय सहाय्यक यांची व्यवस्था करण्यात आली आहे. बी के सी येथील मैदान, गोरेगाव येथील नेसको सेंटर, रेसकोर्स पार्किंग, रिचर्डसन क्रुडास येथील मोकळी जागा, दहिसर आणि अन्य ठिकाणी अशा आधुनिक अशा हजारो बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत.


वरळी डोम येथील व्यवस्था मात्र सगळ्या व्यवस्थेपेक्षा निराळी असून पहिल्यांदाच रुग्ण जेव्हा अति गंभीर होतो आणि त्याला व्हेंटिलेटर टाकण्याची वेळ येते अशा सुसज्ज आय सी यू करण्यात आली आहे. आज अनेक ठिकाणी शहरातील बऱ्यापैकी आय सी यू बेड्स या रुग्णांनी भरुन आहेत. या प्रकरणी अधिक माहिती देताना, या वरळी डोम येथील तात्पुरत्या रुग्णालयांची व्यवस्था पाहणारे खासगी रुग्णालयातील डॉ मुफज्जल लकडावाला सांगतात की, " गेल्या महिन्याभरापासून आम्ही येथे रुग्णांवर उपचार करत असून त्यांना व्यवस्थित उपचार दिले जात आहे. विशेष म्हणजे आम्ही येथे पोर्टेबल एक्स-रे मशीनच्या सहाय्याने येथे गरज असण्याऱ्या रुग्णाचे एक्स-रे काढत असून अचूक निदानाकरिता याची मदत होत आहे. आज पर्यंत आमच्या येथील एकही आरोग्य कर्मचारी सुदैवाने कोरोनाबाधित झाला नसून आता पर्यंत भरती झालेले सर्व रुग्ण उपचार करून घरी गेले आहे.


ते पुढे असेही सांगतात की, " सध्याची वाढती कोरोनाबाधितांची संख्या लक्षात घेऊन आम्ही येथे आय सी यू ची सुविधा लवकरच नागरिकांसासाठी उपलब्ध करून देत असून एक सुसज्ज असं रुग्णालय येथे उभाण्यात आले आहे. आय सी यू ची सुविधा येत्या चार-पाच दिवसात पूर्ण होणार असून विशेष कक्ष येथे निर्माण केला आहे. त्याशिवाय कंटेनर मध्ये काही अति गंभीर रुग्णांसाठी दक्षता विभागाची उभारणी करण्यात आली आहे. येथे आय सी यू व्यस्था सुरू झाल्यानंतर अनेक त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर 24 तास उपस्थित राहणार आहे".


आतापर्यंत 814 कोविड बाधित रुग्णांना येथे दाखल करण्यात आले असून, 432 रुग्ण उपचार घेऊन घरी गेले आहे तर 312 रुग्ण अजूनही या सुविधेमध्ये उपचार घेत आहे. डॉ. लकडावाला यांच्यासोबत ब्रीच कॅण्डी रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नीता वर्टी या काम करत असून गेल्या महिनाभरापेक्षा हे दोन्ही डॉक्टर 12-14 तास रुग्ण सेवा तात्पुरत्या उभारण्याला आलेल्या रुग्णालयात देत आहे. वरळी डोम येथे 600 बेड्स ची व्यवस्था करण्यात आली आहे.


डॉ. वर्टी त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगतात की, " जरी मी एक स्त्रीरोग तज्ज्ञ असली तरी साथीच्या रोगातील रुग्ण व्यवस्थापनाची मला बऱ्यापैकी माहिती होती. यापूर्वी मी काही मेडिकल कॅम्प मध्ये काही दिवस राहून शस्त्रक्रिया करणे आणि ओ पी डी चालवली आहे. या केंद्राचे विशेष म्हणजे आता पर्यंत 20 कोविड बाधित गरोदर महिलांना येथे व्यवस्थित उपचार देण्यात आले असून काही महिला घरी गेल्या आहेत तर काही अजून उपचार घेत आहे. या गरोदर महिलांच्या उपचाराकरिता अशा परिस्थितीत आम्ही एक प्रोटोकॉल बनविला असून त्यांनुसार त्यांना उपचार देण्यात येतात. विशेष म्हणजे एक वॉर्डमध्ये महिला शेवटच्या दिवसापर्यंत आमच्या या केंद्रात उपचार घेत असून तिला कळा आल्यानंतर तिला अॅम्ब्युलन्सने नायर रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिची प्रसूती व्यवस्थित पार पाडण्यात आली."


"या परिस्थितीत खरं तर पहिल्यांदा राजकीय नेते आणि महापालिका प्रशासनाचा अनुभव मी येथे घेतला. आपल्या राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मध्य रात्री पर्यंत रुग्णाची व्यवस्था पाहत असतात आमच्याशी संवाद साधत असतात. याशिवाय महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी सुरेश काकानी, अश्विनी भिडे आणि शरद उगाडे खूप मेहनत घेत आहे. आम्हाला लागणारी सर्व वैद्यकीय यंत्रणा यांनी येथे उभी केली असून याचा रुग्णांना खूप फायदा होत आहे. येथे येणाऱ्या रुग्णांना या आजाराची व्यवस्थित माहिती दिल्यानंतर ते कोणतीही तक्रार न करता उपचार घेतात. येथे अनेक जण आधीच व्याधी असणारे कोविड बाधित रुग्ण पण दखल करण्यात आले होते मात्र सुदैवाने कोणालाही त्रास न होता बहुतांश रुग्ण उपचार करुन घरी गेले आहेत. विशेष म्हणजे या केंद्रात डॉक्टर पूर्णवेळ उपलब्ध असतात त्याशिवाय सीसीटीव्हीवर याचं मॉनिटरिंग केले जाते. त्यामुळे कायम रुग्णावर डॉक्टरांची नजर असते". या शब्दात डॉ. वर्टी यांनी आपला अनुभव सांगितला.


याप्रकरणी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले की, "येत्या आठ दिवसात आयसीयूची सुविधा वरळी डोम येथे उपब्ध होणार असून, मुंबईतील इतर भागातही सुविधा आम्ही उपलब्ध करणार आहोत. विशेष म्हणजे येत्या काही दिवसात 10 बेड्स कार्यान्वित होणार असून त्यातील 5 हजार बेड्स सोबत ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे. या सर्व तात्पुरत्या रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टर तैनात असणार आहेत".


संबंधित बातम्या :