मुंबई : राज्याच्या विविध भागातून कोंबड्या विक्रीसाठी मुंबईत आणल्या जातात. प्रवासादरम्यान काही कोंबड्या मरतात. याच मृत कोंबड्यांचं चिकन विकणारी टोळी मुंबईत सक्रिय आहे. आणि कदाचित हे चिकन तुमच्याही ताटात येऊ शकतं. यामुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. या मेलेल्या कोंबड्यांचं मांस खराब होऊ नये यासाठी त्यावर विषारी रसायनं लावली जातात. यापूर्वीही मुंबईत अशी टोळी सक्रिय होती. त्यावर 'एबीपी माझा'नं तीन वर्षापूर्वी त्याचा पर्दाफाश केला होता. त्यावेळी कारवाईही झाली होती. मात्र ही टोळी पुन्हा सक्रिय झालेली दिसते. या टोळीचा पुन्हा आज 'एबीपी माझा' ने पर्दाफाश केला आहे
दक्षिण मुंबई हे सडलेल्या कोंबड्याचा जणू हॉटस्पॉट आहे. येथे दिवसा ढवळ्या या सडक्या कोंबड्यांचा बाजार लागतो. एखाद्या दिवशी जर सडलेल्या कोंबड्या विकल्या नाही तर बायोलॉजीच्या लॅबमधील अनेक रसायनं या कोंबड्यांच्या मांसाला टिकवण्यासाठी वापरली जातात. मुंबईच्या अनेक झोपड्यांमध्ये या कोंबड्यांना आणलं जातं. कचऱ्यात फेकलेल्या कोंबड्यांना रसायन लावलं जातं आणि पुढचे काही दिवस टिकवलं जातं.
काही दिवसांपूर्वी मासे अनेक दिवस टिकावेत म्हणून फॉर्म्युलीन नावाच्या विषारी द्रव्याचा वापर केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुंबईतही कुजलेल्या कोंबड्यांना काही दिवस टिकवण्यासाठी असंच काहीसं होतं असल्याची शक्यता आहे.
कारण, जर एखाद्या दिवशी मेलेल्या कोंबड्या विकल्या गेल्या नाहीत तर दुसऱ्या दिवशी त्या कोंबड्यांना रस्त्यालगत असलेल्या चायनीज सेंटरवर पोहोचवलं जातं आणि तिथंही विकलं नाही. तर तेच जवळपास सडलेलं चिकन शिवडीमध्ये पोहोचवलं जातं. शिवडीमध्ये त्याला रासायनिक द्रव्यांमध्ये साठवलं जातं. जेणेकरुन पुढचे दोन-एक दिवस तेच चिकन बाजारात विकता यावं. काही रुपयांसाठी ही टोळी तुमचं आमचं आरोग्य धोक्यात आणते. त्याचा पर्दापाश एबीपी माझानं केला आहे. त्यामुळे आता तरी प्रशासन मुंबईकरांच्या आरोग्याची सौदेबाजी रोखणार का? हे पाहवं लागेल.
मुंबईतल्या काही भागात काही हॉटेल्सना ही टोळी मेलेलं चिकनची विक्री करते. या चिकनवर प्रक्रीयेसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांमुळे कॅन्सरचा धोकाही संभवण्याची भीती व्यक्त होते. दरम्यान एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर आता अशा घटकांची चौकशी करून कडक कायदेशीर कारवाई करण्याचं आश्वासन राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांनी दिले आहे.