नागपूर :  सध्या महाराष्ट्रात गांजावरून राजकारण सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांच्या विजयदशमीच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली.  'सामना' ने ह्या टीकेचे उत्तर 'कमी प्रतीचा गांजा' भाजपा नेत्यांनी खेचला असून, त्यामुळे ते असे बेताल बडबडत आहेत अशा आशयाचा अग्रलेख लिहिला. आता अग्रलेखाला उत्तर ही अग्रलेखानेच मिळाले आहे! अत्यंत उपहासात्मक, उपरोधिक अशा पद्धतीने संघ विचारधारेशी निगडित असलेल्या तरुण भारताच्या अग्रलेखाने आज सामनाला हे उत्तर दिलं आहे. तरुण भारताच्या अग्रलेखाचे  शीर्षक आहे - 'गांजा कोणी कोणी ओढला.' 


सामनाच्या अग्रलेखाला भाजपच्या नेत्यांनी उत्तर देण्याऐवजी हे उत्तर तरुण भारताने दिले आहे. खास शिवसेना व त्यानंतर महाविकास आघाडीच्या अनेक मंत्री व खासदार हे ह्या अग्रलेखात निशाण्यावर आहेत. 'गांजा कोणी कोणी ओढला', असा हल्लाबोल करत फक्त आताच्याच नाही, तर महाविकास आघाडीच्या सुरुवातीपासूनच्या बऱ्याच घटनांवर ह्या अग्रलेखात शब्दांचा 'गांजा' छल केला आहे.  अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,  संजय राऊत, शरद पवार, भावना गवळी, अनिल परब,अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक, शंकरराव गडाख, उदय सामंत, अब्दुल सत्तार, प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर, भास्कर जाधव आणि श्रीनिवास वंगा ह्या सर्व मंडळींचा समाचार ह्या अग्रलेखात घेतला आहे. 


सातत्याने रडगाणे गाण्याऐवजी पक्षप्रमुखांनी राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी झटले पाहिजे. परंतु, दुर्दैवाने ते केंद्र सरकारविरुद्ध ओरड करतात आणि स्वत:ची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करतात. हा अनुभव आपण सगळेच दररोज घेत आहोत. अतिवृष्टीमुळे राज्यात शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतक-याला तातडीने मदत देऊन त्याचे मनोबल वाढविण्याची आवश्यकता असताना राज्यातील सत्ताधारी केंद्राकडे बोट दाखवून बेजबाबदारपणे वागत आहेत. 'खासदार संपादक' असलेला नेता सल्ला देतो. वायफळ बडबड करतो आणि पक्षप्रमुख त्यांचीच री ओढतात, हे योग्य नाही असे म्हणत पहिले तर उद्धव ठाकरे आणि नंतर खासदार संजय राऊत ह्यांच्यावर अग्रलेखाने निशाणा साधला आहे.  


तर काहींवर थोडी तिरपी टीकास्त्र डागली आहेत. म्हटलंय - 'शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, ही बाब मान्य केली तरी जनतेने नाकारल्यानंतरही त्यांचा पक्ष नीतिमत्ता गुंडाळून ठेवत सत्तेवर आला आहे, याचा पवारांना सोयीस्कर विसर पडला आहे. देवेंद्र फडणवीसांबाबत काहीही बोलण्याचा नैतिक अधिकार शरद पवारांना नाही. एवढी वर्षे सत्तेत राहूनही त्यांना सत्तेचा मोह आवरत नाही, हे त्यांच्या वागण्या-बोलण्यावरून स्पष्ट झाले आहे. भारतात आजवर किमान 120 वेळा विविध राज्यांतील सरकारे केवळ केंद्रातील सरकारच्या मनात आले म्हणून बरखास्त करण्यात आली. क्षणोक्षणी लोकशाहीचे मुडदे पाडणा-यांनी जेव्हा असे आरोप करायचे चालविलेले असते, तेव्हाच मनात प्रश्न येतो; ‘गांजा कुणी कुणी ओढला?' असा एक प्रश्न अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे...  


अग्रलेखाने दसरा उत्सवातील ठाकरेंच्या भाषणाचाच समाचार घेत म्हटले आहे की आता अनेकांना गांज्याच्या गुणवत्तेचाही अभ्यास झालेला आहे. आम्हाला तो नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही. पण, एक मात्र नक्की की, विरोधकांचे ‘दम मारो दम' हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विजयादशमीच्या भाषणामुळे खचितच नव्हते. कारण ते भाषण तर नव्या बाटलीतील जुनी दारू याच शैलीतील होते. खरं तर हे वाक्य म्हणजे सामनाच्या 'त्या' दिवशीच्या अग्रलेखाला थेट उत्तर. 'कमी प्रतीचा गांजा!' ह्या आपल्या अग्रलेखात सामानाने म्हटले होते की, भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात . लोकशाही , घटना , कायदा त्यांना मान्य नाही . विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री ते स्वीकारत नाहीत अशी टीका सामन्यातून करण्यात आली. राजकारणाचा हा नवा ' पदर ' बरेच काही सांगून जातो.. कमी प्रतीचा गांजा मारल्यानेच या कल्पना त्यांना सुचत असाव्यात . दसरा मेळावा, त्यातील उद्धव ठाकरे यांचे भाषण वाया गेले नाही . ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरून ' दम मारो दम ' करावे लागले . त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरून स्पष्ट होत असे भाजप नेत्यांबाबत सामनाच्या अग्रलेखात म्हंटले होते. 


तसा तरुण भारताचा अग्रलेखाचा पिंड हा सामनासारखा आक्रमक नाही. मात्र आज त्यांनी एक वेगळा अवतार धारण करत ही वाक्य मालिका पुढे नेली आहे - जेव्हा मुख्यमंत्री म्हणतात की, वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री झालो आणि दुस-याच दिवशी शरद पवार सांगतात की, त्यांना मुख्यमंत्री व्हायचेच नव्हते; मीच बळजबरीने हात वर केला... तेव्हा गांजा न ओढताही आपोआपच नशा चढते. आता या दोघांपैकी कोण खरे बोलतो आहे, याचे उत्तर मिळायलाच हवे. उद्धव ठाकरेंना वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते, तर एक सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री का झाला नाही, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो, तेव्हा लोकशाही रक्षणाच्या नावाने गळा काढणारेच म्हणतात, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील हे प्रश्न विचारणारे कोण? अरे बाबा, एक विरोधी पक्षनेते आणि दुसरे एका राष्ट्रीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांनी नाही तर कुणी हे प्रश्न विचारायचे? अशावेळी मनात पुन्हा प्रश्न येतो की, ‘गांजा कुणी कुणी ओढला?'


सामानाने आपल्या अग्रलेखात केंद्रीय तपास यंत्रणेच्या बाबत ही बरीच नाराजी व्यक्त केली होती. सामना लिहिले होते की, . ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर, सूडबाजीवर घणाघात केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारांच्या हक्क व अधिकारांचे हनन चालवले आहे. राज्यांना काम करू द्यायचे नाही. विशेषतः ज्या राज्यांत भाजपचे मुख्यमंत्री नाहीत, तेथे तर केंद्रीय तपस यंत्रणांचा मुक्त हैदोस घातला जात आहे. भाजपकडून सीबीआय, ईडी, आयटी व एनसीबीचा वापर स्वतःची बटीक असल्यासारखा केला जात आहे. ईडी, सीबीआयच्या आडून जे 'शिखंडी' पद्धतीचे राजकारण हे लोक करीत आहेत, त्याचा बुरखाच ठाकरे यांनी फाडला आहे. हिंमत असेल तर मर्दासारखे अंगावर या असा आव्हानात्मक पवित्रा जेव्हा ठाकरे घेतात तेव्हा भाजपने हे आव्हान स्वीकारण्याची मर्दानगी दाखवायला हवी असे हि सामन्यात म्हटले आहे. ह्याला थेट उत्तर देत ईडीच्या केसेस ज्या-ज्या नेत्यांविरोधात आहेत, ते थेट आपली बँक खाती आणि सारी कागदपत्रे घेऊन ईडीच्या कार्यालयात धडक का देत नाहीत? उगाच जर ईडी त्यांना त्रास देते आहे, तर खा. भावना गवळी, अनिल परब, अनिल देशमुख यांनी एकत्रित येऊन ईडीच्या कार्यालयात जावे आणि ‘दूध का दूध, पानी का पानी' करून यावे असे केल्याने त्यांचे स्वच्छ चारित्र्य आणि निर्दोषित्व आपोआपच सिद्ध होईल. केंद्र सरकार यंत्रणांचा गैरवापर करतेय्, हेही सिद्ध होईल. पण, असे न करता केवळ रडत बसले की, आम्हाला पुन्हा प्रश्न पडतो की, ‘गांजा कुणी कुणी ओढला?' असा उपरोधिक सल्ला पण तरुण भारताच्या अग्रलेखाने आज देऊन टाकला आहे. 


इतर ही काही मंत्री नाव न घेता ते अग्रलेखात निशाण्यावर आहे. पण अंगुलीनिर्देश स्पष्ट आहे.  या राज्यातील मंत्री एखाद्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण करतात आणि दीड वर्षांनी त्यांना लोकशाही मूल्यांचे पालन करीत अटक होते. पण, अटक कशी तर जामिनाची कागदपत्रे हातात घेऊनच! फार कुठे त्याच्या बातम्याही होत नाहीत असे म्हणत जितेंद्र आव्हाड ह्यांना ही निशाणा केले आहे. शंकरराव गडाख ह्यांना पण दुसरे मंत्री भाजपाच्या कार्यकर्त्यांचा ऊससुद्धा खरेदी करीत नाही असे म्हणत अग्रलेखात टीकेचे स्थान दिले आहे. एक मंत्री तर म्हणतात की, दोन-तीन ग्रॅम गांजा असेल तर कारवाई करायची गरज नाही. आम्हाला काही वाचकांकडून विचारणा झाली की, मोठ्ठी घरफोडी केली आणि लाखोंचा ऐवज न नेता केवळ काही हजारांचीच चोरी केली तर घरफोडीचा गुन्हा दाखल होणार नाही का? आता अशा प्रश्नांची उत्तरं वकीलच देऊ शकतात हे म्हणत नवाब मलिकांना ही अग्रलेखाने रडारवर घेतलंय. पण, आमच्या मनात पुन्हा प्रश्न येतो, ‘गांजा कुणी कुणी ओढला?'
 
 भाजपा हा उप-यांचा पक्ष आहे, असा आरोप झाल्यापासून भाजपामधील अनेकांच्या मनात धडकी भरली आहे म्हणे. भाजपाच्या अनेक नेत्यांनी याबाबत उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार, प्रियांका चतुर्वेदी, उर्मिला मातोंडकर, भास्कर जाधव, श्रीनिवास वनगा या शिवसेनेच्या नेत्यांशी सल्लामसलत केली आहे म्हणतात. या सर्व नेत्यांनी भाजपा नेत्यांशी बोलण्यास सपशेल नकार दिला. पण, ‘उप-या' या उपाधीने ते अस्वस्थ झाले असल्याची माहिती आहे. ‘मैं भी चौकीदार'च्या धर्तीवर ही सारी मंडळी आपल्या ट्विटर हँडलवर ‘आम्ही सारे उपरे,' अशी मोहीम चालविण्याच्या बेतात होती, अशीसुद्धा माहिती आहे. तेव्हा आमच्या मनात प्रश्न येतो, ‘गांजा कुणी कुणी ओढला?' शेवटी हे सर्व नेते मंडळी घेरताना सामनाला तरुण भारताचे हे उत्तर शेवटी राजकारणाला राजकिय उत्तर ह्यातच मोडते. सामान्य जनतेला मात्र खरंच गांजाच्या राजकारणाने किंवा शब्दछलानी काय मिळते हा मात्र प्रश्नच आहे. त्यामुळे सरतेशेवटी तरुण भारताने विचारलेले काही प्रश्न हे अग्रलेखाचा सर्वात महत्वाचा भाग मानावा लागेल.   


आज महाराष्ट्रात गांजाची प्रत ओळखण्या इतका वेळ कोणाकडेही नाही. शेतकऱ्यांना किती मदत दिली? बारा बलुतेदारांना काय मदत दिली? परतीच्या पावसानेही थैमान घातले त्यांच्यासाठी आपण काय केले? हेक्टरी 50 हजारांच्या मदतीच्या आश्वासनांचे काय झाले? हे शेतकरीच विचारत आहेत. लोकांना विकास हवा आहे अन्यथा आम्हाला आज प्रश्न पडतोय, उद्या संपूर्ण महाराष्ट्र हाच प्रश्न विचारेल  गांजा कोणी कोणी ओढला?