मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केल्याच्या वक्तव्याच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीनं मुंबई न्यायालयाचे दरवाजे ठोठावले गेले आहेत. भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग तिवाना यांनी शिवडी येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात नाना पटोले यांच्या विरोधात अब्रुनुकसानीची याचिका दाखल केली असून कलम 153 बी, 500, 504, 505(2), 506 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.


न्यायालयानं तेजिंदर सिंग तिवाना यांच्या याचिकेवर 28 जानेवारी रोजी सुनावणी घेण्याचं निश्चित केलं आहे. पंतप्रधान हे देशातील घटनात्मक पद आहे आणि या पदाचा अपमान करणं हा संपूर्ण देशाचा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या  वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात आपला निषेध व्यक्त केला आहे. 


मुंबईत भाजपतर्फे 18 जानेवारी रोजी मरिन ड्राईव्ह पोलीस स्थानकाबाहेर आंदोलन केलं गेलं आणि याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली गेली होती. त्यावर मुंबई पोलिसांनी कार्यकर्त्यांना आश्वासन दिलं होतं की, याप्रकरणी चौकशी करून कारवाई करू मात्र अद्याप राज्यात कुठेही गुन्हा नोंदवला गेलेला नाही. त्यामुळे अखेर भाजप युवा मोर्चातर्फे न्यायालयाचा दरवाजा ठोठावला गेला आहे.


भंडाऱ्यात मोदींबद्दल एक वक्तव्य करुन वाद ओढवून घेतलेल्या नाना पटोलेंनी मोदी नाव वापरत आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नाना पटोलेंकडून मोदींबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे. "ज्याची बायको पळते, त्याचं नाव मोदी ठरतं", असं वक्तव्य केल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) पुन्हा वादात सापडले आहेत. दोनच दिवसांपूर्वी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली होती. त्याबद्दल नाना पटोले यांना विचारलं असता नाना पटोलेंनी हे वक्तव्य केलं होतं. दरम्यान, नाना पटोले यांनी नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या इगतपुरी  येथे सुरू असलेल्या काँग्रेस (Congress) प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली होती. मात्र, जाता-जाता पुन्हा एकदा त्यांनी आणखी एका वादाला तोंड फोडलं आहे. 


संबंधित बातम्या :