सांगली : भाजपकडून उमेदवारी मागताना 30 लाखांचा चेक झळकवणाऱ्या कार्यकर्त्याने शिवसेनेत प्रवेश केला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सचिन चौगुलेने उमेदवारी मागितली होती.

मिरजेत भाजपकडून काही दिवसांपूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या. मुलाखती दरम्यान भाजपचा सक्रिय कार्यकर्ता असलेल्या सचिन चौगुलेने मुलाखत घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना थेट तीस लाखांचा चेक दाखवत उमेदवारीची मागणी केली होती.

पैसे असणारा उमेदवार हीच विजयाची क्षमता अशी भाजपाची मानसिकता असेल तर माझ्याकडे 30 लाख रुपये आहेत, असं खळबळजनक विधान करत मुलाखती चालू असतानाच त्याने चेक झळकवला होता. यामुळे व्यासपीठावर बसलेले भाजप आमदार आणि नेत्यांची भंबेरी उडाली होती.



चौगुलेच्या उमेदवारीसाठीच्या या विधानामुळे भाजपच्या उमेदवारी प्रक्रियेवर त्यावेळी प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र आज सचिन चौगुलेने शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना पक्षाचे नेते नितीन बानगुडे पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष संजय विभूते, शेखर माने अशा सांगलीतील नेत्यांचीही उपस्थिती होती.

संबंधित बातमी :

सांगलीत भाजपच्या उमेदवारीसाठी 30 लाखांचा चेक झळकावला!