उस्मानाबाद : डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर नेमकं काय लिहिलेलं असतं, हे केमिस्टशिवाय कुणीही सांगू शकणार नाही, असं गमतीने म्हणतात. सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका प्रिस्क्रिप्शने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हे प्रिस्क्रिप्शन नेमकं कुठल्या डॉक्टरने दिलं आहे, याचा शोध 'एबीपी माझा'ने घेतला आणि जाणून घेतलं यामागील व्हायरल सत्य
या प्रिस्क्रिप्शनने गेल्या आठवड्यात धुमाकूळ घातला. अगम्य भाषेत लिहिलेलं हे प्रिस्क्रिप्शन वाचून व्हॉट्सअॅप यूझर्सची हसून पुरेवाट झाली. अनेकांनी या डॉक्टरला शिव्या शापही दिले.
डॉक्टरने त्या प्रिस्क्रिप्शनमध्ये काय लिहिलं आहे, हे त्याचं त्यालाही कळणार नाही, असे मेसेज फिरु लागले. 'धन्य तो डॉक्टर.... धन्य तो पेशंट... आणि धन्य तो केमिस्ट...' अशीही खिल्ली उडवली गेली.
'जर चांगलं आरोग्य हवं असेल तर ही औषधं खा...'
'या डॉक्टरांकडे नरक मिळेल...'
'या डॉक्टरांकडे हँड राईटिंगचे क्लास चालतात....'
अशा आशयाचे मेसेजेस फिरु लागले.
खरंच असा कोण डॉक्टर आहे, याचाच शोध घेण्यासाठी 'एबीपी माझा'ने या प्रिस्क्रिप्शनवरच्या नंबरवर फोन केला, पण फोन बंद होता.
अखेर आम्ही आमच्या बीडच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून त्या डॉक्टरांचा पत्ता शोधला आणि समोर आलं एक धक्कादायक वास्तव...
38 वर्षाचे धनराज कदम हे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाईतल्या दवाखान्यात प्रॅक्टिस करतात.
गावखेड्यातले दीड-दोनशे रुग्ण उपचारासाठी येतात. फी अत्यंत कमी... 20 रुपये...
याच डॉक्टरांनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन व्हायरल झालं होतं. पण खरंच असं प्रिस्क्रीप्शन डॉक्टरांनी दिलं होतं का?
गेल्या आठवडाभरापासून डॉक्टरांना राज्याच्या विविध भागांतून रोज शेकडो फोन येत आहेत. मेसेजनी डॉक्टरांचा इन बॉक्स भरुन गेला आहे. फोन करणारे पहाट आहे की रात्र कशाचंही भान ठेवत नाहीत.
या वर्षी जानेवारी महिन्यात डॉक्टरांनी शिवाजी चौकात दवाखाना सुरु केला. त्यानंतर 2018 चे लेटर पॅड छापून घेतले.
याच लेटर पॅडचा उपयोग करुन चक्क ऑक्टोबर महिन्याची प्रिस्क्रिप्शन लिहून कुणीतरी पोस्ट व्हायरल केली.
17 वर्षे प्रॅक्टिस करणाऱ्या या डॉक्टरांची चिठ्ठी वाचणाऱ्या औषध विक्रेत्यालाही लोकांनी सोडले नाही. अन्न आणि औषध प्रशासनानं डॉक्टरांना फोन करुन चौकशी केली.
कदम डॉक्टर जळगावला वैद्यकीय अधिकारी होते. त्यांना अंबाजोगाईत गरिबांचा वैद्य म्हणून ओळखतात. महाराष्ट्र शासनाच्या विद्यापीठातून त्यांनी बीएएमएसची पदवी घेतली आहे. अंतिम परीक्षेत डॉक्टर विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट होते.
आयटी कायद्याअंतर्गत डॉक्टरांनी अंबाजोगाई पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. आता पोलिस राज्याच्या किती ग्रुप अॅडमिनला पकडणार, किती फोन करणाऱ्यांना, शिव्या देणाऱ्यांना अटक करणार?
या खोट्या प्रिस्क्रिप्शनचा खुलासा म्हणून डॉक्टरांनी स्वतःचं दोन पानी निवेदन अनेक ग्रुपवर पाठवलं आहे. पण ही निवेदनं वाचतंय कोण?
अगम्य भाषेतील व्हायरल प्रिस्क्रिप्शनचा डॉक्टरांना ताप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Jul 2018 07:07 PM (IST)
अगम्य भाषेतील प्रिस्क्रिप्शन नेमकं कुठल्या डॉक्टरने दिलं आहे, याचा शोध 'एबीपी माझा'ने घेतला आणि जाणून घेतलं यामागील व्हायरल सत्य
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -