नागपूर : “शेतकरी महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी,” अशी मागणी करत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात शेतकरी प्रश्नावरुन सरकारवर हल्ला चढवला.

‘शेतकऱ्यांना पीककर्ज वेळेत मिळायला हवं. बँकेचा सचिव शेतकरी महिलेकडे शरीर सुखाची मागणी करत आहे. हे महाराष्ट्रात कधी घडलं नव्हतं. त्याच्या घरी आयाबहिणी नाहीत काय ? सरकार  अशांवर कारवाई का करत नाही?’ असा सवाल करत अजित पवारांनी सरकारला धारेवर धरलं.

कर्जमाफीची घोषणा फसवी

कर्जमाफीच्या मुद्द्यावरुनही अधिवेशनात अजित पवार आक्रमक झालेले पहायला मिळाले. ‘मागील वर्षी जून महिन्यात मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची घोषणा केली. त्यावेळी मोठा गाजावाजा करण्यात आला. आतापर्यंत किती शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा झाला, याचे आत्मचिंतन सत्ताधाऱ्यांनी करणं गरजेचं आहे,’ असं ते म्हणाले.

‘सरकारने कर्जमाफीचा अर्ज घेण्यासाठी काढलेली ऑनलाइन यंत्रणा नीट नव्हती. बँका आणि सरकारच्या कारभारात ताळमेळ नव्हता. एकाही शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळालेला नाही. सरकारने दीड लाखाची तरी कर्जमाफी केली पाहिजे,’ अशी मागणीही अजित पवारांनी केली.

...तर नावाचा अजित पवार नाही

 ‘सत्ताधारी पक्षाकडे कोणी नव्हतं म्हणून इतर पक्षातून माणसं आणली. मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेसमधून भाजपने माणसं आयात केली आहेत. स्वतःचे लोक राहिले मागे, आमचीच लोक घेऊन सत्ताधाऱ्यांची पोटं मोठी झाली,’ असा टोला त्यांनी भाजपला लगावला.

‘जे सोडून गेले ते कुणाचे नाही. ते उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक आहेत. उद्या सत्ता आली की ते परत आमच्याकडेच येतील, नाही आले तर नावाचा अजित पवार नाही,’ असं म्हणत त्यांनी पक्ष सोडून गेलेल्या लोकांना फटकारलं आहे.

हमीभावावरुन निशाणा

‘निवडणुकीच्या काळात नरेंद्र मोदींनी दीडपट हमीभावाचं आश्वासन दिलं होतं. म्हणून लोकांनी कमळाचे बटन दाबलं. पण हे सरकार जुमला दाखवण्यात माहीर आहे,’ अशी टीका त्यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी बाकावर असताना कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्यावा अशी मागणी करत. आता तुमचे सरकार असताना कापसाला ७ हजार हमीभाव का देत नाही’, असा सवाल अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.