मुंबई : महाराष्ट्रात राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता. काँग्रेस कडून जम्मू-काश्मीरच्या प्रभारी रजनीताई पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 27 सप्टेंबर हा अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे जर भाजपने अर्ज माघारी घेतला नाही तर या एका जागेसाठी 4 ऑक्‍टोबरला मतदान होऊ शकतं.


Rajya Sabha By-Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर, राजीव सातवांच्या रिक्त जागी कुणाला संधी?


एकाच जागेसाठी निवडणूक असल्याने आणि महाविकास आघाडीकडे तूर्तास बहुमत असल्याने निवडणूक फारशी अवघड नाही. पण सरकारकडे स्थापनेवेळी जी ताकद होती ती जशीच्या तशी टिकून आहे की नाही हे या मतदानातून कळू शकतं. राज्यसभेची निवडणूक खुल्या मतदान प्रक्रियेद्वारे होते. म्हणजे प्रत्येक पक्षाच्या आमदाराला असं मत निवडणूक प्रतिनिधीला दाखवून मतपेटीत टाकावं लागतं. अपक्ष आमदारांना मात्र हे मत कुणालाही दाखवण्याची गरज नसते. 


Rajani Patil : राजीव सातव यांच्या निधनामुळं रिक्त जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेसाठी उमेदवारी 


क्रॉस वोटिंग केलं एखाद्या आमदाराने तरी त्यांचे सदस्यत्व लगेच रद्द होत नाही पण पक्षाला वाटलं तर ते अशा आमदारांवर कारवाई करू शकतात. महाराष्ट्रातल्या पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या बारा निलंबित आमदारांना ही मतदानाची संधी मिळणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्या संदर्भात राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. निलंबनामुळे हे आमदार विधानभवनात येऊ शकत नाहीत पण त्यांच्यासाठी विधानभवनाच्या बाहेर मतदान व्यवस्था करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत. 


निलंबित आमदारांना मतदानाची संधी मिळाली नसती तर ही निवडणूक अगदीच एकतर्फी झाली असती. पण निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर आता या मतदानामध्ये काही चुरस निर्माण होते का किंवा सरकारचे संख्याबळ पहिल्यापेक्षा कमी करण्यामध्ये भाजप यशस्वी होतो का हे पाहावे लागेल.


चार ऑक्टोबर रोजी निवडणुकीचा निकाल


महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर  4 ऑक्‍टोबरला निवडणूक होणार आहे. चार ऑक्टोबर रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. सोबतच बिहार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकाही घोषित झाल्या आहेत. या निवडणुका देखील 4 ऑक्टोबरला पार पडतील. तसेच पुद्दुचेरी राज्यसभेच्या एका जागेसाठी 4 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.  
 
पश्चिम बंगालमधील तीन विधानसभेच्या जागांची निवडणूक घोषित


याआधी निवडणूक आयोगानं 4 सप्टेंबर रोजी ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील तीन विधानसभेच्या जागांची निवडणूक घोषित केली आहे. या तीन जागांसाठी 30 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यात पश्चिम बंगालच्या भवानीपूरचा देखील समावेश आहे. जिथून बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या नेता ममता बनर्जी निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकांची मतमोजणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभेचं सदस्यत्व घेत मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी यांना ही निवडणूक जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे.