चंद्रपूर: जिल्ह्यातील आमडी (बेगडे) येथे ग्रामस्थांनी अंगणवाडीतून पोषण आहार नेण्यास पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. या गावातील अंगणवाडीच्या समोर हळद-कुंकू लावलेले लिंबू आढळून आल्याने ग्रामस्थांनी अंगणवाडीतून पोषण आहार नेण्यास बंद केले होते. मात्र त्यानंतर प्रशासन आणि अंगणवाडी सेविकेने घेतलेल्या पुढाकारामुळे सध्या ग्रामस्थांमधील भीतीचं वातावरण दूर झालं आहे.
चिमूर तालुक्यातील आमडी (बेगडे) या गावातील अंगणवाडी बाहेर जादूटोण्याचा हा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. आमडी (बेगडे) येथील अंगणवाडी केंद्राबाहेर गेल्या आठवड्याभरात दोन वेळा लिंबू-हळद टाकल्याच्या प्रकार नजरेस आला. त्यानंतर या केंद्रातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी ग्रामस्थांच्या लक्षात हा प्रकार आणून दिला. त्यामुळे आमडी (बेगडे) या छोट्याश्या गावात या प्रकरणामुळे खळबळ उडाली होती. हा प्रकार जादूटोण्याचा आहे आणि यामुळे आपल्याला काही अपाय होईल या भीतीपोटी ग्रामस्थांनी अंगणवाडी केंद्रातून बालकांसाठी पोषण आहार नेण्यास नकार दिला होता.
ग्रामस्थांनी बालकांसाठी, गर्भवती महिला आणि स्तनदा मातांसाठी पोषण आहार नेण्यास नकार दिल्याने स्थानिक प्रशासनासमोर मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पोषण आहार न घेतल्यास या लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतील याचा विचार करून सरिता गोरवे या अंगणवाडी सेविकेने पुढाकार घेतला आणि अंगणवाडी पुढे पडलेले लिंबं गोळा करून जाळून टाकले. त्यानंतर अंगणवाडी पुढे टाकलेल्या लिंबामुळे जे काही होईल ते आम्हाला होईल पण तुम्ही पोषण आहार थांबवू नका असं म्हणत गोरवे यांनी लोकांची समजूत काढली व त्यानंतर लोकांनी अंगणवाडीतून पोषण आहार नेण्यास सुरुवात केली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एका महिन्यात अंधश्रद्धा-जादूटोणा-भानामतीच्या प्रकारातील ही पाचवी घटना आहे. जादूटोण्याच्या संशयातून गेल्या एका महिन्यात वणी-खुर्द, मिंडाळा, मोहाडी आणि भिवापूर येथे मारहाण झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. या सर्व प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपींना अटक देखील केली. चंद्रपूर जिल्हा प्रशासन गावागावात जनजागरण कार्यक्रम आयोजित करून लोकांच्या मनातील अंधश्रद्धेचे जळमट दूर करण्याचा प्रयत्न करतेय. पण जिल्ह्यात जादूटोण्याच्या घटना वारंवार उघडकीस येत असल्याने हे प्रयत्न आणखी वाढविण्याची गरज असल्याचे पुन्हा एकदा या घटनेमुळे लक्षात आले आहे.
महत्वाच्या बातम्या :