नवी दिल्ली : काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळं  रिक्त जागी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोनिया गांधींकडून या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. रजनी पाटील या माजी खासदार आहेत. त्या सध्या जम्मू-काश्मीरच्या प्रभारी आहेत. राज्यात विधान परिषदेसाठी राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत नाव होतं. पण त्याऐवजी राज्यसभेवर संधी दिली आहे. रजनी पाटील या सोनिया गांधी यांच्या अत्यंत विश्वासू वर्तुळातील आहेत.


 Rajya Sabha By-Election : राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर, राजीव सातवांच्या रिक्त जागी कुणाला संधी?




महाराष्ट्रात राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसह राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 22 सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे तर  4 ऑक्‍टोबरला निवडणूक होणार आहे. चार ऑक्टोबर रोजीच या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. 


सोबतच बिहार विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकाही घोषित झाल्या आहेत. या निवडणुका देखील 4 ऑक्टोबरला पार पडतील. तसेच पुद्दुचेरी राज्यसभेच्या एका जागेसाठी 4 ऑक्टोबरला पोटनिवडणूक होणार आहे.  
 
पश्चिम बंगालमधील तीन विधानसभेच्या जागांची निवडणूक घोषित


याआधी निवडणूक आयोगानं 4 सप्टेंबर रोजी ओडिसा आणि पश्चिम बंगालमधील तीन विधानसभेच्या जागांची निवडणूक घोषित केली आहे. या तीन जागांसाठी 30 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. यात पश्चिम बंगालच्या भवानीपूरचा देखील समावेश आहे. जिथून बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या नेता ममता बनर्जी निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकांची मतमोजणी तीन ऑक्टोबर रोजी होणार आहे. विधानसभेचं सदस्यत्व घेत मुख्यमंत्रीपद कायम ठेवण्यासाठी ममता बॅनर्जी यांना ही निवडणूक जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे. 


ममता बॅनर्जी यांनी विधानसभा निवडणुकीत आपला पारंपारिक मतदारसंघ भवानीपूर येथून निवडणूक न लढवता नंदीग्राममधून निवडणूक लढवली होती. तिथं त्यांचा भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. शुभेंदू अधिकारी हे बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत.