मुंबई : शिवसैनिकाच्या रुपाने देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. शिवसेना आमचाच मुख्यमंत्री होणार असा दावा करत आहे. यासंबंधी एबीपी माझाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी हे वक्तव्य केले आहे. युती व्हावी हीच आमची इच्छा असून अल्पमतातील नाही तर स्थिर सरकार देणार असल्याचेही ते म्हणाले.

भाजपाने सरकार स्थापण्याची सारी तयारी केली आहे. शिवसेनेला काँग्रेसचा पाठींबा मिळणार नाही, त्यामुळे सेनेलाही भाजपशिवाय पर्याय नाही. सेनेकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर 2014 प्रमाणेच अल्पमतातील सरकार स्थापण्याची भाजपची योजना आहे. 2014 प्रमाणेच सेना नंतर सरकारमध्ये सहभागी होईल, असे भाजप नेत्यांना वाटते. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आज राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.

मात्र, सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात अल्पमतातील नाही तर स्थिर सरकार देणार असल्याचे म्हटले आहे. विधिमंडळ गटनेता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांकडे जाणे गरजेचे आहे, असा नियम नाही. त्यांचे प्रतिनिधी म्हणून कोणीही सत्ता स्थापनेचा दावा करु शकतो. मात्र, आज आम्ही राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी नाही, तर सध्याची राजकीय परिस्थिती, भाजपची भूमिका याबद्दल आम्ही राज्यपालांशी भेटून चर्चा करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राज्याच्या राजकारणात येण्याची कोणतीच शक्यता नसल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितलं. तसंच शिवसेनेचा आमदार इतका मजबूत आहे, की त्यांना कोणी फोडणार नाही. काँग्रेसची भूमिका ही विरोधी पक्षात बसण्याची आहे, हे काँग्रेस काय राष्ट्रवादीने अनेकदा स्पष्ट केले असल्याचंही ते म्हणाले. संजय राऊत यांच्यावर बोलताना ते म्हणाले, की राऊत यांच्या भाष्याचा सन्मान करु आणि हा डेडलॉक संपवण्याचा आम्ही प्रयत्न करु.



राज्यपालांना भेटण्याची वेळ बदलली
राज्यपालांना भेटण्याची वेळ बदलण्यासंबंधी मुनगंटीवार म्हणाले, "आम्ही वेळ बदलली नाही, 11 वाजता राज्यपाल यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम होता. मात्र, आम्हाला चर्चेसाठी जास्त वेळ हवा होता, म्हणून दुपारी वेळ घेतली आहे.

संबंधित बातम्या :

आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु, परंतु कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही : संजय राऊत

'मातोश्री'वरील शिवसेना आमदारांच्या बैठकीत मोबाईल फोनवर बंदी