मुंबई : काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की, राज्यात सत्ताधारी लोक इतर पक्षाचे आमदार फोडण्याच्या प्रयत्नात आहेत. राऊत यांच्या या वक्तव्यानंतर आमदार फोडण्याच्या राजकारणाविषयी 'एबीपी माझा'ने शिवसेनेच्या दोन आमदारांकडे विचारणा केली, त्यावर शिवसेना आमदारांनी सांगितले की, आमदार फुटण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत.

शिवसेनेचे राधानगरी मतदारसंघातील आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले की, आमदार फुटण्याचे दिवस संपले आहेत. पूर्वीच्या राजकारणात अशा गोष्टी व्हायच्या. जनता आमच्यापेक्षा हुशार आहेत. पूर्वीच्या काळात आमदार फुटायचे, एखाद्या मोहाला बळी पडायचे. परंतु आता मतदार अशा गोष्टींना थारा देत नाहीत. लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारची गोष्ट केलेली त्यांना मान्य नाही.

शिवसेनेचे बुलडाण्याचे आमदार संजय रायमुलकर म्हणाले की, काल मातोश्रीचा निरोप आल्यानंतर आम्ही सर्व आमदार आज मुंबईत दाखल झालो आहोत. थोड्याच वेळात आमची पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत पक्षप्रमुख सत्तास्थापनेबाबत त्यांचे विचार मांडतील. शिवसेनेचा आमदार मुख्यमंत्री व्हावा ही आमची इच्छा आहेच, परंतु उद्धव ठाकरे घेतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय लवकर व्हायला हवा.

सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात 'मातोश्री'वर शिवसेनेच्या सर्व नवनिर्वाचित आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर शिवसेनेच्या सर्व आमदारांचा नरिमन पॉईंट येथील हॉटेल ट्रायडंट येथे मुक्काम असणार आहे. कोणत्याही पक्षाचे नेते या आमदारांशी संपर्क करु शकणार नाहीत, याची काळजी शिवसेनेने घेतली आहे. एकही आमदार फुटू नये यासाठी शिवसेनेने हा खबरदारीचा उपाय योजला आहे.

पाहा काय म्हणाले शिवसेना आमदार?



आमदार फोडण्याच्या राजकारणावर काय म्हणाले संजय राऊत?



आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु, परंतु कोणत्याही पक्षाचा आमदार फुटणार नाही : संजय राऊत