मुख्यमंत्रिपदावर अडून बसलेल्या शिवसेनेला महसूल, अर्थ खातं सोडण्याची भाजपची तयारी, सूत्रांची माहिती
भाजपने मुख्यमंत्री पदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. मात्र आता या चार खात्यांपैकी दोन खात्यांवर पाणी सोडायचं का? असा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरु झाला आहे.

मुंबई : सध्या सत्तासंघर्षाच्या युद्धात शिवसेनेची तोफ बनून रोज धडाडणारे संजय राऊत यांनी आज उद्धव ठाकरे अंतिम निर्णयापर्यंत पोहचल्याचा भाजपला इशारा दिला आहे. मात्र तरी भाजपकडे बहुमत असूनही सत्ता स्थापनेचा दावा अद्याप केला जात नाही. कारण अल्पमतातलं सरकार टिकवणं भाजपसमोरचं मोठं आव्हान असणार आहे, याची कल्पना त्यांना आहे.
त्यामुळे भाजपने शिवसेनेला सुरुवातीच्या प्रस्तावात घातलेल्या अटी-शर्तींमध्ये फेरविचार करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपने मुख्यमंत्री पदासह गृह, महसूल, नगर विकास आणि वित्त या चार महत्वाच्या खात्यांवर चर्चा होणार नाही, असं स्पष्ट केलं होतं. मात्र आता या चार खात्यांपैकी दोन खात्यांवर पाणी सोडायचं का? असा विचार भाजपच्या वरिष्ठ पातळीवर सुरु झाला आहे. त्यामुळे गृह आणि नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने महसूल आणि वित्त शिवसेनेला देऊ करुन त्यांची नाराजी दूर करता येईल का? याबाबतची तपासणी भाजपकडून सुरु आहे.
आज मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे दोघेही ओल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर आहेत. आज रात्री मुख्यमंत्री दौऱ्याहून मुंबईत परतल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, विजय पुराणिक आणि व्ही सतीश यांच्यासह मुख्यमंत्र्यांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्री पदावरून अडून बसलेल्या शिवसेनेला 'टॉकिंग टर्म्स' वर आणण्यासाठी काय पर्याय आहेत, यावर चर्चा केली जाणार आहे.
उद्यापर्यंत या पर्यायांवर शिवसेनेकडून सकरात्मक प्रतिसाद मिळाला तर सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल. यासाठी शपथविधीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेकडून चर्चेची दारं उघडली तर इतर सर्व वाटाघाटी पूर्ण करुन 7 नोव्हेंबरपर्यंत महायुतीचं सरकार स्थापन करण्याची तयारी भाजपकडून पूर्ण असल्याचं सांगितलं जात आहे.
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
महत्त्वाच्या बातम्या






















