चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि गडचिरोली नगर परिषदेच्या अध्यक्ष योगिता प्रमोद पिपरे यांना नगर विकास मंत्रालयाने अपात्र घोषित केले आहे. शिवाय त्यांना सहा वर्षापर्यंत निवडणूक लढण्यासही मनाई केली आहे. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे. 


डिसेंबर 2016 मध्ये गडचिरोली नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी भाजपच्या योगिता पिपरे थेट जनतेतून निवडून येऊन नगराध्यक्ष झाल्या. नगर परिषदेत भाजपची बहुमताची सत्ता प्रस्थापित झाली. मात्र नगराध्यक्ष आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये विविध कारणांवरुन वाद झाले. पक्ष नेत्यांनी वाद शमविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र वाद कायम राहिला. कोरोना काळात नगर परिषदेचे तत्कालिन बांधकाम सभापती आनंद शृंगारपवार व अन्य 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करुन नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली. 



नगराध्यक्ष पिपरे या आपल्या पदाचा गैरवापर करुन बेकायदेशिररित्या ठराव मंजूर करवून घेत आहेत. शिवाय त्यांनी भाड्याचे वाहन वापरुन 11 लाख 61 हजार 914 रुपयांची उचल केली आहे. हे नियमबाह्य असल्याने पिपरे यांना अपात्र घोषित करावे, असे तक्रारकर्त्या नगरसेवकांचे म्हणणे होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दोन्ही बाजू ऐकून नगराध्यक्ष पिपरे यांना अपात्र करण्याविषयीचा प्रस्ताव नगर विकास मंत्रालयाकडे पाठविला होता. त्याचा पाठपुरावा झालाही. नगरविकास मंत्रालयाने निर्णय दिला नाही. तक्रारकर्त्या नगरसेवकांनी उच्च न्यायालयाचे दार ठोठावले. 



उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने यासंदर्भात नगरविकास मंत्रालयाला नोटीस बजावून लवकरात लवकर उचित निर्णय घेण्याचा आदेश दिले. त्यावर नगर विकास मंत्रालयाने नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वाक्षरीचा आदेश आज जिल्हाधिकारी कार्यालयात पोचला. डिसेंबर वा जानेवारीमध्ये नगर परिषदेची पंचवार्षिकसार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्षांना अपात्र घोषित करण्यात आल्याने भाजप वर्तुळात खळबळ उडाली आहे.