नवी दिल्ली :  पंजाबच्या (Punjab) राजकारणाने वेगळं वळण घेतलं असून पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्यासाठी दिल्लीच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. अमरिंदर सिंग आणि अमित शाह यांच्या भेटीनंतर  राजकीय चर्चांना उधाण आले आहे.   त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह आता भाजपमध्ये प्रवेश करणार का याची उत्सुकता आहे.  कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. 


नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसच्या अंतर्गत मतभेदावर आणि प्रत्येक राजकीय हालचालीवर भाजपच्या दिल्लीतील नेत्यांची बारीक नजर होती. याचा राजकीय फायदा घेण्यासाठी आतुरलेल्या भाजपने आपला पहिला डाव टाकला असून त्याचाच एक भाग म्हणून आज कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली आहे.


गेल्या आठ महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा फटका पंजाबमध्ये भाजपला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण ऐनवेळी कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यासारखा मोहरा भाजपच्या हाती लागल्यास सत्तेचा डाव भाजपच्या पारड्यात पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. आता पंजाबमधील शेतकऱ्यांचा केंद्र सरकारला असलेला विरोध लक्षात घेता कॅप्टन अमरिंदर सिंह हे भाजपमध्ये प्रवेश करण्याची रिस्क घेतात का याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.


पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नवज्योतसिंह सिद्धू यांची नियुक्ती केल्यानंतर सिद्धू आणि मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यातील वाद मिटण्याची आशा काँग्रेस हायकमांडला होती. पण तसं न होता हा वाद अधिक चिघळत गेला. शेवटी कॅप्टन अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.  


'आतापर्यंत झाला तो अपमान बस झाला, यापुढे असा अपमान सहन करत काँग्रेसमध्ये राहू शकत नाही' असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस हायकमांडला दिला होता. त्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्यात आला. राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आपण नाराज असल्याचं सांगत आपल्यासाठी सर्व मार्ग खुले असल्याचंही सांगितलं होतं.