Ramtek Constituency Election : काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या निकालांनी देश आणि राज्य पातळीवर भाजपला चांगलाच धक्का दिला आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप्रणित (BJP) आघाड्यांची मोठी पिछेहाट झाल्याचे चित्र आहे. राज्यातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी भाजपप्रणित महायुतीला (Mahayuti) अवघ्या 17 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीची (MVA Alliance) 30 जागांवर सरशी झाली आहे. या निकालांनी महायुती आणि भाजपचे नेते प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. कारण लोकसभेचा हाच ट्रेंड आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) कायम राहिला तर कदाचित महायुतीची सत्ता जाणे अटळ असल्याची शक्यता आहे.


दुसरीकडे विदर्भातील भाजपची बऱ्यापैकी पकड असलेल्या मतदारसंघातही महायुतीचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने  (Congress) घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी असे महायुतीला यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. अशातच रामटेक मतदारसंघात (Ramtek Constituency Election) लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांमध्येही खडाजंगी कायम असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.  


रामटेक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी कायम 


रामटेकमध्ये आमदार आशिष जयस्वाल यांचे काम करण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिल्याची माहिती पुढे आली आहे. भाजपचे नागपूर जिल्हा प्रभारी कैलास विजय वर्गीय यांच्यासमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी जयस्वाल यांना तीव्र विरोध दर्शवला आहे. आशिष जयस्वाल हे शिंदे समर्थक आमदार असून ते रामटेक विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले आहेत. तर नागपूर जिल्हा प्रभारी कैलास विजय वर्गीय यांच्या उपस्थितीत रामटेक येथे झालेल्या भाजपच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांची रोखठोक भूमिका मांडत आशिष जयस्वाल यांचे काम करण्यास भाजप पदाधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.


2019 च्या निवडणुकीत भाजप उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरोधात जयस्वाल अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आणि जिंकले. त्यावेळी त्यांनी युतीचा धर्म पाळला नाही. त्यामुळे महायुतीने जयस्वाल यांना तिकीट दिले तर भाजप कार्यकर्ते त्यांचं काम करणार नसल्याची पदाधिकाऱ्यांची विजयवर्गीय यांच्यासमोर भूमिका मांडली आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी कायम असल्याचे चित्र असून भाजप आणि शिवसेना पक्षातील उच्चपदस्थ नेते हा वाद कसा सोडवतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या