Vidhansabha Election News : काँग्रेसच्या (Congress) गोटातून एक महत्वाची बातमी पुढे आली आहे. आगामी विधानासभेच्या (Maharashtra Assembly Election 2024)अनुषंगाने काँग्रेसने आतापर्यंत महाराष्ट्रातील 288 मतदार संघापैकी 172 मतदारसंघाचा आढावा पूर्ण केला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. यात पुणे विभाग, अमरावती विभाग, कोंकण विभाग, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मतदारसंघाचा सहभाग आहे. तर उर्वरित विभागातील मतदारसंघाचा आढावा लवकरच घेतला जाणार असल्याचेही बोलले जात आहे. सोबतच जेथे मित्र पक्षाचे उमेदवार होते तेथे काँग्रेस पक्षाची ताकद आणि मतदारसंघाचा ऐकूण आढावा घेतला जात आहे. त्यामुळे व्यक्तिगत रित्या काँग्रेसपक्ष प्रत्यक्ष कामाला लागला असल्याचे बघायला मिळत आहे.


सावधगिरी म्हणून 288 पूर्वतयारी म्हणून हा आढावा 


राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक आता अवघ्या दोन-तीन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने महायुती आणि महाविकास आघाडीने मोर्चेबांधणी सुरु केली असली तरी जागावाटपाची (MVA Seat Sharing) चर्चा अजून पुढे सरकलेली नाही. त्यामुळे निवडणूक अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली तरी तीन पक्षांचा समावेश असलेल्या दोन्ही आघाड्यांचे जागावाटप कसे पार पडणार, याकडे सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.


या पार्श्वभूमीवर काँग्रेसने  महाराष्ट्रातील 288 मतदार संघापैकी 172 मतदारसंघाचा आढावा पूर्ण केला आहे. 2019 मध्ये काँग्रेस पक्षाकडून उमेवार राहिलेल्या उमेदवाराने मागच्या 5 वर्षात काय कामे केली, तो मतदारांच्या संपर्कात होता का? पक्ष संघटनेत सक्रिय होता का? याची संपूर्ण माहिती काँग्रेस प्रक्षश्रेष्ठीकडून घेतली जात आहे. तर जेथे मित्र पक्षाचे उमेदवार होते तेथे काँग्रेस पक्षाची टाकत व संघाचा संपूर्ण आढावा यात घेतला जात आहे. काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीम्हणून निवडणुकीला पुढे जाणार असली तरी सावधगिरी म्हणून 288 पूर्वतयारी म्हणून हा आढावा असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून कळतं आहे.


तिकीट वाटपात मोठी अडचण होणार


राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला  चांगलं यश मिळालं असल्याने काँग्रेसमध्ये इच्छुकांची मांदियाळी दिसून येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघातही अनेक दिग्गज रिंगणात उतरणार असून काँग्रेस नेते अनिल धानोरकर यांनी आता विधानसभेसाठी शड्डू ठोकलाय. अनिल धानोरकर आता वरोरा विधानसभेसाठी इच्छुक असून दिवंगत काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांचे ते सख्खे मोठे बंधू आहेत. मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून त्यांचे बंधू प्रवीण काकडे यांना वरोरा विधानसभेत उमेदवारी मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यातच आता अनिल धानोरकर यांनी कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढणारच हे स्पष्ट केल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या समोर तिकीट वाटप करताना मोठी अडचण निर्माण होणार असल्याचे दिसून येत आहे.  


हे ही वाचा 


Rahul Gandhi : काँग्रेस सत्तेत आल्यास राहुल गांधी 100 टक्के पंतप्रधानपदाचे दावेदार, राज्यसभेवर बिनविरोध निवड झालेल्या नेत्यानं कारणं सांगितली...