Shirur Loksabha News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) गटातील आणखी एक समर्थकांच्या जागेवर भाजपने (BJP) दावा केला आहे. पुण्यातील शिरूर (Pune Shirur News) लोकसभा जिंकण्याच्या इराद्याने भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्या शिंदे गटात असलेले शिवाजी आढळराव (Shivaji Adhalrao Patil) इथून तीव्र इच्छुक आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हा मतदारसंघ राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांना सोडणार होते. म्हणूनच आढळरावांनी शिंदे गटाशी घरोबा केला. 


अशा परिस्थितीत भाजपने शिरूर लोकसभा जिंकण्याचा निर्धार केला आहे. यासाठी केंद्रीय मंत्री रेणूका सिंह (Renuka Singh) शिरूर लोकसभेचा तीन दिवसीय दौरा करणार आहेत. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान या मतदारसंघात संघटनात्मक आणि सार्वजनिक कार्यक्रम घेणार आहेत. 


निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळांनी दिली माहिती


शिरूर लोकसभेच्या निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळांनी (MLA Madhuri Misal) पत्रकार परिषद घेत, 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपचाच उमेदवार इथं निवडून येईल, असं जाहीर केलं. ही घोषणा भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात वितुष्ट निर्माण करणारी ठरू शकते. आता शिंदे गटाचे समर्थक शिवाजी आढळराव यावर काय भूमिका घेतात हे पाहणं ही महत्वाचं राहील.


मंत्री रेणूका सिंह तीन दिवसीय दौऱ्यात 21 ठिकाणी भेटी देणार


केंद्रीय आदिवासी विकास मंत्री रेणूका सिंह या तीन दिवसीय दौऱ्यात 21 ठिकाणी भेटी देतील. संघटनात्मक आणि सार्वजनिक असे हे कार्यक्रम असतील. पदाधिकाऱ्यांशी संवाद, लाभार्थींची चर्चा, भाजपा परिवारातील संस्था, संघटनांच्या प्रतिनिधींशी संवाद, हुतात्मे- महात्मे यांच्या स्मारकांना भेटी, वारकरी सांप्रदायातील लोकांशी संवाद, तीर्थक्षेत्र भीमाशंकर भेट, स्थानिक नागरिकांशी संवाद, आदिवासी बांधवांशी चर्चा, शासकीय अधिकाऱ्यांशी आढावा बैठक, महामार्ग समस्या पाहणी आदी कार्यक्रम नियोजित केले आहेत.


शिवाजी आढळरावांनी भाष्य करणं तूर्तास टाळलं 


शिंदे गटाच्या शिवाजी आढळरावांनी यावर भाष्य करणं तूर्तास तरी टाळलं आहे. नेहमी आक्रमक भूमिका घेणारे, रोखठोक बोलणारे आढळराव यावेळी मात्र मवाळ झालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय स्तरावरचे नेते याबाबत ठरवतील, असं म्हणून प्रतिक्रिया देणं त्यांनी टाळलेलं आहे. जेव्हा उद्धव ठाकरेंनी शिरूर लोकसभा राष्ट्रवादीला सोडणार असं म्हटलं होतं, तेव्हा मात्र आढळराव चांगलेच चवताळले होते. यातूनच त्यांनी थेट शिंदे गटाशी घरोबा केला होता आता पुढचा खासदार हा आमचाच असेल असा दावा भाजपने केला. यावर बोलताना मात्र ते जिंकणार असतील जिंकणार असतील, यावर मी काय बोलू, अशी नरमाईची भूमिका आढळरावांनी घेतली.