मुंबई : भाजपा आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्यावर गोळीबार केला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी आमदार गणपत गायकवाड व त्यांच्या दोन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, या गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्यावर उपचार सुरु आहेत. दुसरीकडे कल्याण पूर्व भागात तणावपूर्ण शांतता पसरली आहे. त्यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. विशेष म्हणजे आधी राजकीय वार- पलटवार आणि त्यानंतर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर आता दोन्ही गटात 'सोशल वॉर' पाहायला मिळत आहे.
गोळीबाराच्या घटनेनंतर सोशल मीडियावर दोन्ही गटाच्या समर्थकांकडून समर्थन,पाठिंबा देणारे रिल्स व्हायरल केले जात आहेत. आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनार्थ त्यांचे कार्यकर्ते रिल्स व्हायरल करतायत, तर दुसरीकडे शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांना पाठिंबा देणारे रिल्स देखील त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर व्हायरल होतायत. एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देणारे हे रील्स वायरल होत असल्याने एकूणच सोशल मीडियावर देखील वातावरण तापू लागलंय.
दोन्ही गटात 'सोशल वॉर'...
गोळीबार करणारे भाजप आमदार गणपत गायकवाड आणि जखमी झालेले शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड या दोघांना मानणारा मोठा गट आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक या घटनेनंतर आक्रमक होतांना पाहायला मिळाले होते. अशात गोळीबाराचा व्हिडिओ देखील समोर आला. सध्या परिस्थिती नियंत्रणा असली, तरीही दोन्ही गटाकडून आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांना उत्तर दिले जात आहे. फेसबुक, इंस्टाग्रामवर दोन्ही गटाचे कार्यकर्ते आपल्या नेत्याचे फोटो आणि रील्स व्हायरल करत आहेत. विशेष म्हणजे या रील्सला वेगवेगळ्या चित्रपटातील गाणे आणि डायलॉग जोडले जात आहे. त्यामुळे सोशल मीडियावरील वातावरण चांगलेच तापले आहे.
कडेकोट पोलीस बंदोबस्त
भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी जमिनीच्या वादातून उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड व त्यांचा साथीदार राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महेश गायकवाड, राहुल पाटील यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड व त्यांच्या दोन साथीदाराना अटक करण्यात देखील झाली आहे. आमदार गायकवाड यांच्यासह दोघे आरोपी पोलीस कोठडीत आहेत. या गोळीबाराच्या घटनेनंतर कल्याण पूर्व परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
इतर महत्वाच्या बातम्या :