ठाणे : आमदार गणपत गायकवाड  (Ganpat Gaikwad) यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केले म्हणून उल्हासनगरमधील सेंट्रल पोलीस स्टेशनमध्ये भाजपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हे सगळे कार्यकर्ते गोळीबार प्रकरणी आरोपी असलेल्या आमदार गणपत गायकवाड यांच्या समर्थनासाठी उल्हासनगरच्या चोपडा कोर्टाबाहेर घोषणाबाजी करत होते.


आमदार गणपत गायकवाड यांना उल्हासनगरच्या कोर्टात शनिवारी हजर करण्यासाठी पोलीस बंदोबस्तामध्ये घेऊन येत असताना कार्यकर्त्यांनी कोर्टाबाहेर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला. त्यामुळे भाजपाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांवरती उल्हासनगरच्या सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 


गणपत गायकवाड यांना ज्यावेळी कोर्टात आणलं गेलं त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. 'कोण आला रे कोण आला, कल्याणचा वाघ आला',भारतीय जनता पार्टीचा विजय असो, 'गणपत शेठ आगे बढो, हम तुम्हारे साथ है', गरीबों का नेता कैसा गणपत शेठ जैसा अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्ते देत होते. 


गुड्डू खान, मोना सेठ, निलेश बोबडे, शिलाराज, सुरज खान, अंजली खामकर, विद्या त्रिंबके, भावेश तोल , सरिता जाधव, लावण्या दळवी ,यशोदा माळी आणि इतर 25 ते 30 अनोळखी महिला, पुरुषांनी जोरजोराने घोषणाबाजी केली. त्यांनी पोलीस उपायुक्त विशेष शाखा आणि शहर यांच्याकडील मनाई आदेशाचा भंग केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37(3) 135 अधिवेशन सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


काय आहे प्रकरण? 


भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाच्या महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याचा प्रकार घडला. जमिनीच्या संबंधित वादामुळे हा गोळीबार झाल्याचं समोर आलं. शुक्रवारी हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहचले. यावेळी गणपत गायकवाड यांचा मुलगा देखील पोलीस ठाण्यात होता. मात्र पोलीस काही कारवाई करत नसल्याचा आरोप करत स्वतः गणपत गायकवाड पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यांनी थेट शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. 


मी स्वत: पोलिसांसमोरच गोळी झाडली याचा मला याचा पश्चाताप नाही. कारण माझ्या मुलांना जर ते पोलिसांच्या समोर मारत असतील, तर मग मी काय करणार. पोलिसांनी मला पकडलं, त्यामुळेच तो वाचला. मी त्यांना जीवे मारणार नव्हतो, पण पोलिसांच्या समोर जर असं कोणी करत असेल तर आत्मसंरक्षणासाठी हे करणं गरजेचं असल्याचं गणपत गायकवाड म्हणाले.


दरम्यान, भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


ही बातमी वाचा: