जालना: वीजबिल भरलं तरी मिटर का काढलं, तिकडे झोपडपट्टीत जाऊन मिटर काढा असं सांगत भाजप आमदार बबनराव लोणीकरांनी महावितरणच्या कर्मचाऱ्याला धमकी दिली आहे. लोणीकरांनी त्या कर्मचाऱ्याला निंलबित करण्याची धमकी तर दिलीच पण त्याचसोबत आयकर विभागाकरवी धाड टाकण्याची धमकीही दिली. 


आमदार बबनराव लोणीकरांची ऑडिओ क्लिप ही 'माझा'च्या हाती लागली असून त्यामध्ये ते कर्मचाऱ्याला धमकी दिल्याचं स्पष्ट होतंय. बिल भरलं तरी मिटर का काढून नेलं, हिंमत असेल तर झोपडपट्टीमध्ये जाऊन मिटर काढा असंही ते म्हणाले. दरम्यान, आमदार बबनराव लोणीकरणांनी दादासाहेब काळे या महावितरणच्या कर्मचाऱ्याशी बोलताना काही अपशब्दही वापरले.


आमदार बबनराव लोणीकरांच्या घराचे तीन लाखांपेक्षा जास्त थकबाकी असल्याची माहिती होती. त्यामुळे महावितरणने त्यांच्या घराचे मिटर कट केले. हे समजताच बबनराव लोणीकरांनी दादासाहेब काळे या कर्मचाऱ्याला धमकी दिली. हा ऑडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


या विषयावर एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी महावितरणच्या कर्मचाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. दरम्यान, माजी मंत्री आणि आमदार बबनराव लोणीकरांनीही यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 


दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांनी जर वीजबिल भरलं नाही तर महावितरण त्यावर तडक कारवाई करते. अशा वेळी जर त्या नागरिकांकडून विरोध झालाच तर शासकीय कामात अडथळा आल्याचं कारण देत महावितरण संबंधितावर गुन्हा नोंद करते. आता आमदार बबनराव लोणीकरांनी तर महावितरणच्या कर्मचाऱ्याला थेट धमकीच दिल्यानंतर महावितरण काय भूमिका घेतंय हे पाहणे औत्सुक्याचं आहे. 


संबंधित बातमी :