बुलढाणा : आपल्या देशात लग्नात हौसमौज करतात. मग लग्न मुलाचं असो वा मुलीचं ते धुमधडाक्यात व्हावं हे प्रत्येक वधू-वराचं आणि त्यांच्या आई-वडिलांचं असतं. लग्नाच्या रेशीमगाठीचे क्षण संस्मरणीय करण्यासाठी कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्यासाठी वधू-वराची एन्ट्री कधी हेलिकॉप्टर, कधी मोटरसायकल तर कधी बैलगाडीतून होते. लग्नात शक्यतो मुलाची घोड्यावरुन वरात काढली जाते. पण हिच परंपरा मोडून बुलढाण्यातील एका दाम्पत्याने आपल्या मुलीच्या लग्नात तिची घोड्यावरुन वरात काढली. या दाम्पत्याला मुलगा नाही, परंतु त्याची खंत न बाळगता लाडक्या लेकीची घोड्यावरुन वरात काढून आपली लग्नातील हौसमौज पूर्ण केली. 


दोन वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झालं होतं. त्यातच लग्नकार्य जे धुमधडाक्याने साजरे होतात, त्यावरही निर्बंध आले होते. पण आता काही प्रमाणात नियम शिथिल झाल्यामुळे पुन्हा एकदा बँड बाजा बारात दणक्यात सुरु आहे. डीजेवर नाच गाणे पुन्हा एकदा सुरु झाले आहे. यातच बुलढाण्यातील खामगाव इथले विजयराव सांगळे आणि पुष्पा सांगळे यांची मुलगी समीक्षा हिचा विवाह 26 मार्च रोजी भास्कर उर्फ धनराज राऊत याच्यासोबत पार पडला. हे लग्न खास होतं कारण आई-वडिलांनी तिची वरात चक्क घोड्यावरुन काढली. त्यापूर्वी 24 मार्चला बँडबाजा आणि डीजेच्या तालावर समीक्षाची वरात दणक्यात निघाली. या वरातीत 90 टक्के महिलाच होत्या. फेटे बांधलेल्या महिला डीजेच्या तालावर थिरकल्या.


विजय सांगळे हे एका खासगी दुकानात नोकरी करतात, त्यांच्या पत्नी गृहिणी आहेत, आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य असलेल्या या दाम्पत्याला दोन मुली आहेत. आपल्याला मुलगा नाही याची ना त्यांनी अपेक्षा ठेवली ना शल्य मनात ठेवलं. त्यांनी आपल्या मोठ्या मुलीची वरात घोड्यावरुन काढून एक आदर्श ठेवला आहे, असंच म्हणावं लागेल.


मुला-मुलींमध्ये भेद नाही, मुलगा-मुलगी एकसमान असं सातत्याने जनप्रबोधन केलं जातात. पण सांगळे परिवाराने कृतीतून मुलगा-मुलगी समान असल्याचं दाखवून दिलं आहे. त्यांचं हे कृत्य निश्चितच कौतुकास्पद आहे, त्यामुळे जिल्हासह सगळीकडेच या लग्नाची, घोड्यावरुन वरात काढलेल्या वधूची आणि तिच्या आई-वडिलांची चर्चा आहे.