Maharashtra Cabinet Expansion : शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) अखेर पार पडला. भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde)यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मौन सोडत माझी पात्रता नसल्याने मंत्रिपद दिलं नसेल असं म्हटलं. आता भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पंकजा मुंडे यांच्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पक्षाकडून लवकरच मोठी जबाबदारी मिळेल, असं नवनियुक्त मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा आहे. आपली पात्रता नसल्यानं मंत्रिपद दिलं नसावं असा टोला पंकजा मुंडे यांनी कालच लगावला होता. या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनीही भाजपवर टीका केली होती. त्यावर गिरीश महाजन यांनी उत्तर दिलं आहे. 


गिरीश महाजन म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी मला फोनवरून शुभेच्छा दिल्या आहेत. माझं आणि त्यांचं बोलणं झालं.  पंकजा मुंडे आजिबात नाराज नाहीत. त्यांच्या कामाची दखल घेऊन लवकरच त्यांना पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात येईल, असं ते म्हणाले.  


ओबीसींवर कुठल्याही प्रकारचा अन्याय नाही : गिरीश महाजन
गिरीश महाजन यांनी काल म्हटलं होतं की, "ओबीसींची कुठल्याही प्रकारची नाराजी नाही. ओबीसींना या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून त्यांच्यावर अन्याय झालेला नाही. पंकजा मुंडे यांची कुठल्याही प्रकारची नाराजी नसून असेल तर पक्षश्रेष्ठी त्यांची नाराजी दूर करतील."


ते म्हणाले की, हे लोकाभिमुख सरकार आहे.  मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब झाला असला तरी सर्व ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांना मदत दिली आहे. आधीचे मुख्यमंत्री तर केवळ घरात तसेच मंत्रालयात बसून सरकार चालवत होते, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.


डबल इंजिन सरकार


महाजन म्हणाले की, आता केंद्र आणि राज्यात सरकार आहे. त्यामुळे डबल इंजिन सरकार आहे. सध्या खातेवाटपावरून शिंदे सरकारमध्ये अनेक जण नाराज असल्याच्या चर्चांवर बोलताना मंत्री  गिरीश महाजन यांनी म्हटलं की, कोणीही नाराज नाही आणि कुठलीही फाटाफूट येणार नाही.


एकनाथ खडसेंवरही महाजनांची टीका


एकनाथ खडसेंच्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, मला किंवा माझ्या परिवाराला मिळालं पाहिजे, बाकी कुणाला काही मिळू नये, अशीच एकनाथ खडसेंची भावना आहे. त्यांना भाजपनं भरभरून दिलं आहे.  सुडाचं राजकारण होत असल्याचं विरोधकांकडून बोललं जात आहे. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळातच सुडाचं राजकारण झालं. आम्ही आता विकासाचा राजकारण करु, असंही गिरीश महाजन यांनी बोलताना म्हटलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Pankaja Munde : माझी पात्रता नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नसेल, पंकजा मुंडेंची खदखद


Maharashtra Cabinet Expansion : पंकजा मुंडे यांचं भाष्य, फडणवीसांचं मौन, खडसेंची भाजपवर टीका आणि महाजन यांचं प्रत्युत्तर