जालना : लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर मंत्री, आमदार-खासदारांकडून उद्घाटनांचा सपाटा सुरु आहे. जालना जिल्ह्यात काल झालेल्या एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात पाणीपुरवठा मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकरांचा संयम सुटला. लोणीकरांनी एका गावकऱ्याला दमदाटी केल्याची ऑडिओ क्लीप वायरल झाली आहे.
भाजपचे बबनराव लोणीकर हे जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. परतुर तालुक्यातील टाकली रंगोपंत गावात लोणीकरांच्या हस्ते रस्ते आणि विविध विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम होता. यावेळी बबनराव लोणीकरांनी आपल्या पाणीपुरवठा योजनांचा पाढा वाचला.
पाणीटंचाईच्या झळा सहन करणाऱ्या जायकू काउतकर या गावकऱ्याने 'गावात आम्हाला पाणी नाही' असं म्हणत मंत्र्यापुढे आपली कैफियत मांडली. यावर लोणीकरांचा पारा चढला आणि त्यांनी गावकऱ्याला दमदाटी करुन शांत बसवलं. इतकंच नाही, तर पोलिसांना त्याला बाजूला करण्याचे आदेशही दिले.
'जादूची कांडी आहे का ही? इतका पैसा खर्च केला... खाली बस... बस खाली... बासुंदीत मीठाचा खडा टाकायला लागलास का? पोलिस कोण आहेत? कोणाकडून तरी पाच-दहा हजारांची सुपारी घेतली असेल' असंही लोणीकर बोलताना ऑडिओ क्लीपमध्ये ऐकू येत आहे.
'एबीपी माझा'ने बबनराव लोणीकरांशी संपर्क साधला असता संबंधित व्यक्ती ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून कार्यरत होती, मात्र कामातील हलगर्जीमुळे त्याला काढून टाकण्यात आलं. अंतर्गत वादाचा वचपा काढत असण्यासाठी तो आरोप करत होता, असा दावा लोणीकरांनी केला.
गावात पाणी नसल्याची तक्रार करणाऱ्या गावकऱ्याला बबनराव लोणीकरांची दमदाटी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2019 11:46 AM (IST)
'जादूची कांडी आहे का ही? इतका पैसा खर्च केला... खाली बस... बस खाली... बासुंदीत मीठाचा खडा टाकायला लागलास का? पोलिस कोण आहेत? कोणाकडून तरी पाच-दहा हजारांची सुपारी घेतली असेल' असं बबनराव लोणीकर बोलताना ऑडिओ क्लीपमध्ये ऐकू येत आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -