नावडत्या पतीची नवविवाहितेने केली हत्या, चोरांनी पतीला मारल्याचा केला होता कांगावा
एबीपी माझा वेब टीम | 09 Mar 2019 08:05 AM (IST)
जगदीश साळुंखे असं या घटनेतल्या 25 वर्षीय मृत पतीचं नाव होतं. एका फार्मा कंपनीत काम करणाऱ्या जगदीश याचं तीनच महिन्यांपूर्वी मालाडच्या वृषाली नामक 22 वर्षीय तरुणीशी लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या आधीपासूनच वृषालीला जगदीश आवडत नव्हता.
मुंबई : पती आवडत नाही, म्हणून एका नवविवाहितेनं पतीची हत्या केल्याचा प्रकार कल्याणमध्ये समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे सुरुवातीला चोरांनी पतीला मारल्याचा बनाव पत्नीने रचला होता. मात्र पोस्टमोर्टम रिपोर्टमुळे हा बनाव उघड झाला. जगदीश साळुंखे असं या घटनेतल्या 25 वर्षीय मृत पतीचं नाव होतं. एका फार्मा कंपनीत काम करणाऱ्या जगदीश याचं तीनच महिन्यांपूर्वी मालाडच्या वृषाली नामक 22 वर्षीय तरुणीशी लग्न झालं होतं. मात्र लग्नाच्या आधीपासूनच वृषालीला जगदीश आवडत नव्हता. त्यामुळे 6 मार्च रोजी संध्याकाळी 8 ते 9 वाजेच्या दरम्यान वृषालीने पतीचा घरातच खून केला आणि चोरट्यांनी आपल्या पतीची हत्या केल्याचा बनाव रचला. त्यावेळी कोळसेवाडी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. जगदीश याचं पोस्टमोर्टम केलं असता रिपोर्टमध्ये त्याला विष देऊन नंतर गळा दाबण्यात आल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे पोलिसांनी त्याची पत्नी वृषाली हिची चौकशी केली असता तिनेच आपल्या पतीची हत्या केल्याची कबूली दिली. यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा वृषालीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली आहे.