सांगली : सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, सर्व सभापती आणि पदाधिकारी बदला, अन्यथा आठ दिवसात भूकंप घडवू, असा इशारा सत्ताधारी भाजपाच्याच 20 जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आहे. यामुळे जिल्हा परिषदेत सत्तेत असलेल्या भाजपमध्ये बंडाळी उठली आहे. भाजपमधील 20 जिल्हा परिषद सदस्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपा आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सांगली जिल्हा परिषदेत भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी भाजपातील सदस्यांनी विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर पदाधिकारी बदलाची जाहीर मागणी केली आहे. सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपाची सत्ता असून याठिकाणी भाजपाचे संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत, तर शिवसेनेचे सुहास बाबर हे उपाध्यक्ष आहेत.

दरम्यान अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बदलाची मागणी सत्ताधारी भाजपाच्याच सदस्यांनी एकत्र येत केली आहे. आज या सदस्यांनी पत्रकार परिषदेत घेऊन सत्ताधारी भाजप नेत्यांना बंडाचा झेंडा दाखवला आहे.

आठ दिवसात अध्यक्ष व पदाधिकारी बदला, अन्यथा जिल्हा परिषदेत भूकंप घडवू, असा इशारा दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सदस्यांनी हा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेतील भाजपमधील गटबाजी व संघर्ष उफाळून आला आहे.

पक्षश्रेष्ठींकडून याबाबत दखल न घेतल्यास या सदस्यांनी राजीनामाअस्त्र उगारण्याचा इशारा दिला आहे. भाजप सदस्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.