कोल्हापूर : कोल्हापुरातील अंबाबाईच्या मंदिरात तोकडे कपडे घालून जाणाऱ्यांना यापुढे प्रवेश मिळणार नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देवस्थानच्या तीन हजारांहून अधिक मंदिरांसाठी लागू असणार आहे. त्यामुळे 'देवाच्या दारी पूर्ण वस्त्र परिधान करी' असं असेल तरच दर्शन मिळणार आहे.
नवरात्रोत्सवाचा ज्वर शिगेला पोहचलेला असतानाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवा आदेश काढला आहे. या काळात स्त्री आणि पुरुष भाविकांनी पूर्ण पोषाखातच मंदिरात यावं, असा आदेश काढण्यात आला आहे. आता देवस्थान समिती थेट महिलांच्या कपड्यांवर घसरल्यानं महिलांमध्ये संतापाची लाट उसळली.
इतकंच काय, भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी तर आंदोलनाचाच इशारा दिला. चहूबाजूने कोंडी झाल्यानंतर अध्यक्षांना उपरती झाली आणि हा आदेश नसून विनंती असल्याचं अध्यक्षांनी सांगितलं.
मुळात तोकड्या कपड्यांची व्याख्या काय? कुणी कसे कपडे घालावे हे कोण ठरवणार? शिवाय मंदिरांमध्ये तोकडे कपडे घालून मुद्दाम कोण येईल? त्यामुळे प्रशासनाने असले फतवे काढू नयेत आणि भाविकांनीही मंदिराचं सौहार्द टिकवावं, इतकीच अपेक्षा आहे.
अंबाबाईच्या दर्शनाला तोकड्या कपड्यातील भक्तांना नो एन्ट्री
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Oct 2018 11:02 PM (IST)
नवरात्रोत्सवाचा ज्वर शिगेला पोहचलेला असतानाच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने तोकड्या कपड्यातील भक्तांना प्रवेश न देण्याचा आदेश काढला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -