मुंबई : काँग्रेसच्या पाच कार्याध्यक्षांपैकी एक भाजपात आला तर कोणाला आश्चर्य वाटायला नको, अशी सूचक प्रतिक्रिया महसूल मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. भाजप प्रदेश कार्यालयात आज चंद्रकांत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते.


यावेळी ते म्हणाले की, मी याला पद नाही, जबाबदारी म्हणतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत युतीचे राज्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपला 51 टक्क्यांहून जास्त मतदान मिळालं. 227 च्या जागांमध्ये आम्ही पुढे आहोत. त्यात वाढ होईल पण कमी होणार नाही, असेही पाटील म्हणाले.

येत्या निवडणुकीत विजयासाठी सहयोगी पक्षाला जिंकवणं तितकंच महत्वाचं आहे. निवडणूक होऊन निकाल लागणं ही फक्त औपचारिकता आहे. निकाल आजच लागला असल्याचेही ते म्हणाले.



शिवसेनेने सत्तेत असून मोर्चा काढला आणि महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले तर त्यात काही चूक नाही. सरकार चुकत असेल तर सत्तेत असलेल्या प्रत्येक सहयोगी पक्षाने सरकारवर अंकुश ठेवलाच पाहिजे, असे पाटील म्हणाले. कालच मंत्रिमंडळ बैठकीत पीक विमाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आढावा घेतला होता. 2300 कोटींचा प्रीमियम भरून 15 हजार कोटींचे परतावे मिळाले ही आजपर्यंत सर्वाधिक रक्कम आहे, असेही ते म्हणाले.

घटक पक्षांना सामावून घेण्यासाठी त्यांना जागा द्याव्या लागतील. जागा वाटपावर चर्चेला बसू तेव्हा आकड्यांवर एकमत करून निर्णय करू. युतीच्या बाबतीत प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट या प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत बारामती जिंकू असा निर्धार व्यक्त करतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

मोदींजींचे सेनापती म्हणून दादांना जबाबदारी : मुख्यमंत्री

चंद्रकांत दादा गेली साडेचार वर्षे अनेक खाती, जबाबदारी, विधानपरिषदेतील काम सक्षमपणे पाहत आहेत. कार्यक्षम मंत्री म्हणून प्रतिमा उभी केली आहे. पण त्यांचा मूळ पींड संघटनात्मक कार्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दादा गेली 25 वर्षं फिरले आहेत. मला विश्वास आहे की मोदींजींचे सेनापती म्हणून दादांना ही जबाबदारी मिळाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. रावसाहेब दानवे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळालं आणि साडेचार वर्षे पूर्ण झाली म्हणून त्यांना पदभार सोडावा लागला आहे. भाजपमध्ये संघटनेला अनन्य साधारण महत्व आहे. जे गेल्या 50 वर्षात आधीच्या सरकारला जमलं नाही ते काम सरकारने पावणे पाच वर्षांत केलं आहे याचा अभिमान आहे. नूतन अध्यक्षांच्या माध्यमातून भाजप घरा घरात, मना मनात पोहचेल याचा मला विश्वास आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.