मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या चार नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भाजपच्या चार नेत्यांच्या साखर कारखान्यांना एकूण 310 कोटींची बँकहमी दिली होती. ही हमी रद्द करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे. त्यामुळे माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे आणि सोलापूरचे कल्याणराव काळे यांना मोठा धक्का बसला आहे.


उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यापासून भाजप सरकारच्या निर्णयांचा आढावा घेण्याचं काम सुरु केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज हा मोठा निर्णय घेण्यात आला. विधानसभा निवडणुकीच्या आधी बँकहमी व खेळत्या भांडवलापोटी या चार नेत्यांच्या कारखान्यांना तत्कालीन भाजप सरकारने मदत केली होती.


पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखाना, विनय कोरे यांचा श्री तात्यासाहेब वारणा साखर कारखाना व काँग्रेसमधून भाजपत गेलेले कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखाना यांना तत्कालीन भाजप सरकारने हमी दिली होती. यामध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला 50 कोटी, धनंजय महाडिक यांच्या कारखान्याला 5 कोटी, विनय कोरे यांच्या कारखान्याला 100 कोटी आणि कल्याणराव काळे यांच्या कारखान्याला 75 कोटी रुपयांची हमी सरकारकडून देण्यात आली होती.