BJP Leader on Kirit Somaiya : आयएनएस विक्रांत निधी अपहारप्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर नॉट रिचेबल असलेल्या भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या प्रकरणी आरोप केले आहेत, मात्र कोणतेही पुरावे दिले नसल्याचा पुनरुच्चार सोमय्यांनी केला आहे. तसंच ठाकरे सरकारमधील घोटाळेबाजांना धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराही सोमय्या यांनी दिला आहे. 


आयएनएस विक्रांत (INS Vikrant) निधी प्रकरणी अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर किरीट सोमय्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. काल (सोमवारी) भाजप नेते किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळला आहे. त्यानंतर या व्हिडीओमध्ये मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. तसेच, ठाकरे सरकारचे घोटाळे उघड करत राहणार असल्याचा आक्रमक पवित्राही किरीट सोमय्यांनी घेतला आहे. 


भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले की, "मुंबई पोलिसांकडे एकही कागद नाहीये. तक्रारदारांनी सांगितलं की, संजय राऊतांनी पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांवरुन आम्ही तक्रार दाखल केली आहे. संजय राऊतजी 17 डिसेंबर 2013 रोजी ज्यावेळी आपण सगळे राष्ट्रपतींची भेट घेण्यासाठी गेलो होतो. त्यानंतर राज्यपालांकडेही गेलो होतो. त्यावेळी शिवसेनेते मोठे नेतेही होते. ठाकरे सरकारच्या घोटोळेबाजांविरुद्ध कारवाई होईपर्यंत किरीट सोमय्या मागे हटणार नाही, शांत बसणार नाही. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागणार आहोत."


पाहा व्हिडीओ : आयएनएस विक्रांत प्रकरणी जामीन फेटाळल्यानंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया



आयएनएस विक्रांतच्या निधीप्रकरणी गुन्हा दाखल असलेले किरीट सोमय्या आहेत कुठे असा प्रश्न सर्वांना पडलेला आहे. किरीट सोमय्या फरार झाल्याचा दावा वारंवार संजय राऊत करत आहेत. त्यासंदर्भात त्यांनी ट्वीटही केलं होतं. अशातच आता किरीट सोमय्या यांनी व्हिडीओ जारी केला आहे. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर पहिल्यांदाच किरीट सोमय्यांनी आपली प्रतिक्रिया दिली. दरम्यान, काल मुंबई सत्र न्यायालयानं किरीट सोमय्यांना दणका देत, त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. तर किरीट सोमय्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आजा सुनावणी पार पडणार आहे. 


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांची विक्रांत फाईल्स उघडत, अनेक खळबळजनक आरोप केले होते. आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत किरीट सोमय्या यांनी घोटाळा केल्याचा आरोप संजय राऊतांनी केला आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या  आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉम्बे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


संजय राऊतांनी काय आरोप केले?


शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर आयएनएस विक्रांतसाठी गोळा केलेल्या मदतनिधीत घोटाळा केल्याचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की, आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी जमा करण्यात आलेला निधी हा राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं होतं. आरटीआय कार्यकर्ते विरेंद्र उपाध्ये यांनी राज्यपाल कार्यालयाकडून याबाबतही माहिती मागवली होती. मात्र, राज्यपाल कार्यालयात असा कोणताही निधी मिळाला नसल्याची माहिती राज्यपाल कार्यालयानं दिली असल्याचं राऊत यांनी म्हटलं होतं. माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागवण्यात आलेल्या माहितीतून ही बाब समोर आली असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं होतं. हा देशद्रोहीपणा असून त्याचा तपास केंद्रीय संस्थांनी करावा असं आव्हानही राऊत यांनी केलं. सोमय्या हे सीए असल्यामुळे असा पैसा कसा पचवायचा याची त्यांनी माहिती असल्याचंही राऊत यांनी म्हटलं आहे. या प्रकरणी महाराष्ट्र सरकारनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :