Kirit Somaiya : दापोली पोलीस ठाण्याला लागलेल्या आगीवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सूचक ट्विट केले आहे. "दापोली पोलीस स्टेशनला आग. पोलीस ठाण्यात अनिल परब यांच्या बेकायदेशीर रिसॉर्ट्सची कागदपत्रे/पुरावे होते, याची काळजी वाटते, असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले आहे. 


शनिवारी (14 मे) दापोली पोलीस ठाण्याला आग लागली होती. सकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक पोलीस ठाण्याला आग लागली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु, या आगीत अनेक रेकार्ड भक्ष्यस्थानी पडल्याची माहिती मिळत आहे. हाच धागा पकडत किरीट सोमय्या यांनी हे ट्विट केले आहे. 


किरीट सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना याबाबत पत्र देखील लिहिले आहे. "दापोली पोलीस ठाणे येथे काही दिवसांपूर्वी आग लागली. या आगीत मी दिलेली तक्रार, अनधिकृत साई रिसॉर्ट आणि सी कौंच रिसॉर्ट, अनिल परब/सदानंद कदम या संबंधीचे केंद्र सरकार, राज्य सराकर, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केलेली कार्यवाही, पोलिसांसोबत केलेला पत्रव्यवहार सुरक्षित आहे का? या संबंधीचा मुख्य तक्रारदार मी असल्यामुळे मला याची अधिक चिंता आहे, असे सोमय्या यांनी दापोली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 






दरम्यान, पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे या आगीत काही कागदपत्रे जळाली आहेत की नाही याबाबत अद्यात माहिती मिळालेली नाही. 


"अनिल परब यांचं रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचे जुलै 2021 मध्ये राज्य सरकारने घोषित केले आहे. त्यानंतर जानेवारीत नोटीस देखील देण्यात आली होती. नोटीस दिल्यानंतर  90 दिवसांच्या आत रिसॉर्टवर कारवाई व्हायला पाहिजे होती.   परंतु, अद्याप त्याच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. रिसॉर्टवर कारवाई झाल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.


महत्वाच्या बातम्या


Dapoli Fire PHOTO : दापोली पोलिस स्थानकात भीषण आगीचा थरार