Junnar News Latest Updates : पाळीव कुत्र्याला बिबट्याच्या तावडीतून वाचविण्यासाठी मालकाने थेट बिबट्याचा पाठलाग केला. हा थरार सीसीटीव्हीत ही कैद झाला आहे. मदन काकडे असं धाडसी मालकाचे नाव आहे. दुर्दैवाने मालक स्वतःच्या कुत्र्याला वाचवू शकले नाहीत. मृत्यू पावलेल्या पाळीव कुत्र्याचे राजा असं नाव होतं. पुण्याच्या जुन्नर तालुक्यात ही घटना आज पहाटे पाचच्या सुमारास घडली.


जुन्नर तालुक्यातील काळवाडी गावात काकडे कुटुंबिय राहतात. मदन काकडे शेती करतात तर त्यांच्या पत्नी शुभांगी काकडे या पोलीस पाटील आहेत. ग्रामीण भाग त्यात शेतात घर असल्यानं स्वरक्षणासाठी त्यांनी कुत्र पाळलं होतं. त्याचं नाव होत राजा. गेल्या पाच-सहा वर्षांपासून राजा घरचा सदस्य बनला होता. काकडे कुटुंबियांना ही त्याचा लळा लागला होता. राजा ही इमाने-इतबारे त्यांच्या मदतीला धावायचा. काकडे कुटुंबीय झोपले की तो दाराजवळ जागता पहारा द्यायचा. आज पहाटे साडे चार वाजता शुभांगी उठल्या, लागलीच त्यांनी अंगण लोटलं अन् त्या घरात गेल्या. घराचे दार खुलेच होते. तेव्हाच पाठोपाठ चोरट्या पावलाने बिबट्या घराच्या दिशेने आला. बिबट्या जवळ येताच, राजा सावध झाला. पण स्वतःचा जीव वाचविण्याचा वेळ ही राजाकडे उरला नव्हता.


पुढच्या सेकंदाला बिबट्याने राजाचा गळा जबड्यात धरला. बाहेर राजावर बिबट्याने हल्ला केल्याचा अंदाज काकडे कुटुंबियांना आला होता. घरातले सगळेच जागे होते, तेव्हा मदन काकडे आहे तसे बाहेर आले. जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. याची कल्पना असतानाही, मागचा-पुढचा विचार न करता ते थेट बिबट्याच्या दिशेने धावले. पण राजाला जबड्यात घेऊन बिबट्या उसाच्या शेतात घुसला. राजाला वाचविण्यासाठी मालक मदन काकडे यांनी बिबट्याचा पाठलाग केला. मात्र बिबट्याच्या चपळाईपुढं त्यांना हार मानावी लागली. या हल्ल्यात कुत्र्याचा मृत्यू झाला. हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.


काकडे कुटुंबियांच्या या आधीच्या पाळीव कुत्र्याचा ही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी शेजारच्या एका व्यक्तिचा कुत्रा देखील बिबट्याने असाच पळवला होता. हा अनुभव पाहता राजाच्या मानेला काकडे कुटुंबियांनी खिळ्यांचा पट्टा लावला होता. राजावर या आधी ही बिबट्याने दोन वेळा हल्ले केले. तेव्हा मात्र काकडे कुटुंबियांनी बिबट्याला पळवून लावले. यावेळी मात्र बिबट्या यशस्वी झाला. परिसरात बिबट्याची दहशत वाढत चालली असून यासाठी वनविभागानं बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिक आणि शेतकरी करत आहेत.