Kirit Somaiya on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडतायेत. आता हा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आज किरीट सोमय्या संजय राऊत यांच्याविरोधात अब्रूनुकसानीची तक्रार दाखल करणार आहेत. संजय राऊतांनी सोमय्या कुटुंबाशी संबधित युवक प्रतिष्ठानवर टॉयलेट घोटाळ्याचा आरोप लावला आहे. हे आरोप बिनबुडाचे असल्याचं सोमय्यांचं म्हणणं आहे.


उद्धव ठाकरे यांना कोणीतरी धडा शिकवला पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून संजय राऊत असे आरोप करत असल्याचे सोमय्या म्हणाले. 'बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल' असेही सोमय्या म्हणाले. आज आम्ही तिघेही पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज सकाळी 11 वाजता सोमय्या मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी मेधा सोमय्या आणि नील सोमय्या हे उपस्थित राहणार आहेत. सोमय्यांनी पोलीस ठाणे गाठण्यापूर्वी संजय राऊतांनी ट्विट करत सोमय्या कुटुंबाशी संबधित युवक प्रतिष्ठानवर नवा आरोप केला आहे. ज्या कंपनीवर सोमय्यांनी आरोप केले होते त्याच कंपनीनं युवक प्रतिष्ठानला मोठा निधी दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.


पोलीस स्टेशनमध्ये जर एफआयर दाखल करुन घेतली नाही तर शिवडी येथील कोर्टात मानहाणीचा दावा दाखल करणार असल्याचे सोमय्या म्हणाले. जर आज मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये काही घडलं तर त्याची जबाबदारी ही पूर्णपणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची असणार आहे. गेल्या साडेतीन महिन्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी माझ्याविरोधात 12 घोटाळे काढल्याचे भासवले आहे. मात्र, यांच्या खोट्या भोंग्यांना आता महाराष्ट्रातील जनता हसत असल्याचे सोमय्या म्हणाले. 


मी, माझी पत्नी आणि मुलाने जर काही केले असेल तर तुम्ही कारवाई करा, पण आम्ही काही केलंच नाही तर काय कारवाई करणार असेही सोमय्या म्हणाले. संजय राऊत यांनी महिलेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज संजय राऊत यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. दरम्यान, किरीट सोमय्यांच्या कुटुंबीयांनी शेकडो कोटींचा टॉयलेट घोटाळा केला असून, लवकरच हा घोटाळा बाहेर काढण्यात येईल असं संजय राऊत यांनी म्हटले होते. या त्यांच्या आरोपानंतर किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत.