Sanjay Raut : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या कंपनीने त्यांच्याच संस्थेला दोन वर्षांनी देणगी दिली असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.  आप क्रोनोलॉजी समजिए म्हणत संजय राऊत यांनी  सोमय्या आणि ईडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. 


किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात, विशेषत: शिवसेनेच्या नेत्यांविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यानंतर मागील काही महिन्यांपासून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी सोमय्यांनी निधी जमवला होता. या निधीत सोमय्यांनी अपहार केला असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. या प्रकरणी किरीट सोमय्यांविरोधात गुन्हा दाखल असून सध्या त्यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. 


संजय राऊत यांनी काय म्हटले?


संजय राऊत यांनी आज सोमय्यांविरोधात आज सकाळीच दोन ट्वीट केले. संजय राऊत यांनी किरीट का कमाल, असे म्हणत एक ट्वीट केले आहे. वर्ष 2013-14 मध्ये किरीट सोमय्या यांनी एका कंपनीविरोधात आरोप केले होते. त्यानंतर कंपनीच्या प्रमुखाची ईडीने चौकशीदेखील केली.  त्यानंतर 2018-19 मध्ये सोमय्या यांच्याशी संबंधित युवक प्रतिष्ठानला याच कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला. क्रोनोलॉजी समजिए असं म्हणत राऊत यांनी आपण या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे म्हटले.






ही खंडणी नाही का?


संजय राऊत यांनी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास एक ट्वीट करत ही खंडणी नाही का असा सवाल केला. ईडी, सीबीआय, आयकर विभाग, सेबी यांच्या रडारवर असलेल्या कंपन्यांकडून किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला कोट्यवधींचा निधी कसा काय मिळाला की हा काळा पैसा पांढरा करण्याचा घाणेरडा डाव आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला. याचा हिशोब द्यावाच लागणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. या प्रकरणी धर्मादाय आयुक्त आणि तपास यंत्रणांकडे तक्रार केली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. 






 


आता ठाकरे परिवाराचा नंबर ; किरीट सोमय्यांचा इशारा   


दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्री असो की, ठाकरे परिवारातील कोणी असो, घोटाळा करणाऱ्यांना सोडणार नाही. मंत्र्यांचे नंबर लागले आहेत, आता ठाकरे परिवाराचा नंबर आहे, असा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला.  रविवारी विरारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. 


किरीट सोमय्या आज पत्नी आणि मुलांसह मुलुंड पोलीस ठाण्यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अब्रू नुकसानीची तक्रार दाखल करणार आहेत. त्यानंतर सात दिवसात काही कारवाई झाली नाही तर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.