Navneet Rana And Ravi Rana : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण राणा दाम्पत्याविरोधात सरकारी पक्ष कोर्टात जाणार आहे. राणा यांनी न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचा दावा सरकारी वकिलांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याचा जामीन रद्द करण्यासाठी सरकारी पक्ष कोर्टात जाणार आहे. दरम्यान, नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


राजद्रोहाच्या आरोपाखाली 14 दिवस न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाकडून (Mumbai Sessions Court) सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता. परंतु, आता सशर्त जामिनावर जेलमधून बाहेर आलेल्या राणा दाम्पत्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण जामिनावर सुटल्यानंतर माध्यमांशी बोलण्यास न्यायालयानं मनाई केली होती. असं असतानाही नवनीत राणा आणि रवी राणा यांनी पुन्हा पुन्हा माध्यमांसमोर वक्तव्य केली. त्यामुळे राणा यांचा जामीन रद्द व्हावा यासाठी कोर्टात जाणार असल्याचं विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. तुरुंगातून बाहेर आलेल्या नवनीत राणा रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी हनुमान चालिसा पठणावरून वक्तव्य केलंच आणि त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही आव्हान दिलं. राणा यांचे व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी न्यायालयाच्या अटींचं उल्लंघन केल्याचं दिसतंय, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. 


नवनीत राणांचं मुख्यमंत्र्यांना ओपन चॅलेंज


मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानं कोठडीत जावं लागलेल्या नवनीत राणा यांनी तुरुंगातून बाहेर येताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं. हिंमत असेल तर त्यांनी आपल्याविरोधात निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान राणा यांनी दिलं. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात निवडणूक लढवावी, मी त्यांच्या विरोधात निवडणूक लढीन, असं राणा म्हणाल्या आहेत. एवढंच नाहीतर मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शिवसेनेच्या विरोधात प्रचार करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. 


राणा दाम्पत्य दिल्लीत जाऊन तक्रार करणार 


राणा विरुद्ध शिवसेना यांच्यातला वाद पुन्हा तीव्र होण्याची चिन्हं आहेत. कारण जेलमधून बाहेर आलेलं राणा दाम्पत्य आज दिल्लीत जाऊन तक्रार करणार आहेत. तर दुसरीकडे बीएमसीचं पथक आज नवनीत राणा यांच्या मुंबईतील खारमधील निवासस्थानी जाऊन त्यांच्या घरात झालेल्या कथित बेकायदा बांधकामाची तपासणी करण्याची शक्यता आहे. नवनीत आणि रवी राणा आज सकाळी दिल्लीला रवाना होणार आहेत. तिथं ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन पोलीस ठाण्यात आणि जेलमध्ये वाईट वागणूक मिळाल्याची तक्रार करणार आहेत. बीएमसीचं पथक आज पुन्हा एकदा राणा यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. याआधी दोन वेळा बीएमसीचे अधिकारी राणांच्या घरी बेकायदा बांधकामाची पाहणी करण्यासाठी गेले होते, पण घर बंद असल्यानं नोटीस देऊन ते परतले.


नेमकं प्रकरण काय? 


सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता. 


तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं आणि या नाट्यावर पडदा पडला. पण त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं. न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर राणा दाम्पत्यानं जामीन अर्ज दाखल केला होता. त्यानंतर अनेक सुनावण्या झाल्या. सरकारकडून राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध केला जात होता. अखेर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :