भोपाळ : उत्तरप्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचं काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराच्या भूमिपूजनाची तारीख देखील निश्चित झाली असून 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी मंदिरांचं भूमिपूजन करणार आहेत. परंतु, राममंदिराच्या भूमिपूजनाच्या तारखेवर जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असून हा मुहूर्ताची वेळ अशुभ असल्याचं सांगितलं आहे.


शंकराचार्य सरस्वती म्हणाले की, 'आम्हाला कोणतेही पद नको किंवा राम मंदिराचे विश्वस्थही व्हायचे नाहीये. आमची इतकीच इच्छा आहे की, मंदिराचं काम व्यवस्थित व्हायला हवं आणि योग्य वेळी पायाभरणी करायला हवी. पण, सध्याची ही वेळ अशुभ वेळ आहे.' तसेच मंदीर जनतेच्या पैशातून उभारले जाणार आहे, त्यामुळे मंदिराच्या बांधकामासंदर्भात लोकांचीही मतं जाणून घ्यायला हवीत, असंही ते म्हणाले.


नरसिंहपूर जिल्ह्यातील आपल्या आश्रमामध्ये बोलताना जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, 'सनातन धर्माचा मूळ पाया वेद आहे. वेदांनुसार केलेल्या कर्मास यज्ञ म्हणतात. जे पूर्णपणे कालगणनेवर आधारित आहेत. विशिष्ट कालावधीच्या शुभ आणि अशुभ गोष्टीची गणना आणि ज्ञान ज्योतिष शास्त्राद्वारे ज्ञात आहे. म्हणूनच ज्योतिषाला वेदांग म्हणतात. त्यामुळे सनातन धर्मातील प्रत्येक अनुयायी आपलं कोणतंही काम उत्तम कालखंडातच सुरु करतो. ज्याला शुभ मूहुर्त म्हणून ओळखलं जातं.


सनातनी समाज आज दुखी आहे : शंकराचार्य


जगद्गुरु शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, 'प्रत्येक छोटं-मोठं काम शुभ मुहूर्तावर सुरु करणारा सनातनी समाज आहे दुखी आहे. कारण संपूर्ण देशभरातील कोट्यवधी लोकांच्या आस्थेचं केंद्र असलेलं राम मंदीर शुभ मूहुर्ताविना सुरु होणार आहे.' पुढे बोलताना ते म्हणाले की, 'जर अयोध्येत मंदीराचं भूमिपूजन होणार असेल तर ते शास्त्रानुसार, शुभ मूहुर्तावर होणं गरजेचं आहे. परंतु, असं न करता मनमानी स्वरूपाचा कारभार करण्यात येत आहे. त्यावरून स्पष्ट होत आहे की, ते त्या ठिकाणी मंदीर नाही संघाचं कार्यालय तयार करत आहेत.'


शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती म्हणाले की, '5 ऑगस्ट 2020 रोजी दक्षिणायन भाद्रपद मास कृष्ण पक्षाची द्वितीया तिथि आहे. शास्त्रानुसार भाद्रपद महिन्यात गृह-मंदिरारंभ करणं निषिद्ध आहे. लक्षात असेल तर काशीमध्ये विश्वनाथ मंदिराच्या आजूबाजूची मंदिरे तोडताना आम्ही चेतावणी दिली होती की, हे काम पूर्ण विश्वाला संकटात आणू शकतं. परंतु, त्यावेळी दुर्लक्ष करण्याचे परिणाम आता सर्वजण पाहत आहेत.'


पाहा व्हिडीओ : माजी सनदी अधिकारी माधव गोडबोले यांची मुलाखत; बाबरी विध्वंस ते राम मंदिर भूमीपूजन मुहूर्त



दरम्यान, अयोध्येत राम मंदिराच्या कामासाठी शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे...देशाच्या राजकारणात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ दिलेली ही घोषणा आता प्रत्यक्षात येताना दिसणार आहे. मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान झाल्यानंतर मोदींची ही पहिलीच अयोध्या भेट आहे. वाराणसी, केदारनाथसारख्या इतर मंदिरांना त्यांनी अनेकदा भेट दिली. पण अयोध्येचा विषय कोर्टाकडे होता. आता थेट संकल्पपूर्तीवेळीच मोदी अयोध्येत दिसतील.


महत्त्वाच्या बातम्या : 


ठरलं!, अयोध्येत 5 ऑगस्टला पंतप्रधान मोदी करणार राममंदिराचं भूमिपूजन


राम मंदिराच्या कामाचा मुहूर्त ठरला, असं असेल राममंदिर!