बीड : बीड जिल्ह्यात हनीट्रॅपचा प्रकार समोर आला आहे. एका व्यापाऱ्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल पंधरा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली. एवढेच नाही तर यावेळी व्हिडीओ शूट करुन ब्लॅकमेलही करण्यात आलं. या हनीट्रॅप गॅंगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश असल्याचा संशय वर्तवला जात आहे.


कसे घडले हनीट्रॅप?
आष्टी येथील एका महिलेने केज तालुक्यातील टाकळी इथला वीटभट्टीचा चालक असलेल्या नितीन बारगजे यांना फोन केला. तुमच्याकडून विटा खरेदी करायच्या आहेत असे सांगून मांजरसुंबा येथे बोलावून घेतले. या ठिकाणी महिलेसोबत विट खरेदीसंदर्भात बोलणी झाली.


पहिल्या भेटीमध्येच या महिलेने व्यापाऱ्याला हेरले. विटा खरेदीसंदर्भातल्या व्यवहाराची बोलणी झाल्यानंतर, या महिलेने नितीन बारगजे यांना 'माझ्या सोबत कोणी नाही, मला पाटोद्यापर्यंत सोडा,' अशी विनवणी केली. त्यानुसार बारगजे पाटोद्यापर्यंत सोडण्यास गेले. ठरलेल्या नियोजनाप्रमाणे पाटोदापर्यंत सोडल्यानंतर पुढे माझ्या आरती गावापर्यंत सोडता का? असे या महिलेने व्यापाऱ्याला विचारलं. आधी मांजरसुंबा त्यानंतर पाटोदा आणि त्यानंतर नितीन बारगजे यांनी या महिलेला घरी सोडले.


घरी गेल्यानंतर महिलेने नितीन बारगजे यांना चहापाण्याचा आग्रह केल्यानंतर त्यांनीही चहा घेतला. त्यानंतर नियोजनबद्ध पद्धतीने बारगजे यास एका रुममध्ये कोंडले आणि महिलेने जबरदस्तीने लगट केली. त्याचा व्हिडीओ महिलेच्या साथीदारांनी काढला. हा व्हिडीओ आम्ही व्हायरल करु, असा दम देत त्याला मारहाण करत 15 लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली. त्यानुसार 10 लाख रुपये देतो, त्यासाठी माझी शेती विकतो, असं नितीन बारगजेने सांगितलं.


दहा लाख रुपये देण्याच्या अटीवर नितीन बारगजे यांना सोडण्याचे निश्चित झाले. त्यानंतर त्या महिलेने बारगजे यांच्यासोबत एकाला मोटरसायकलवर केजपर्यंत पाठवले. आपण पूर्णपणे अडकल्याची जाणीव झाल्यानंतर बारगजे यांनी केजमधल्या आपल्या मित्र-परिवाराकडे दहा लाख रुपये हात उसणे मागितले. अचानक दहा लाख रुपये कशाला हवेत? असा प्रश्‍न काही मित्रांना पडल्यानंतर यात काही तरी काळंबेरं आहे असा संशय त्यांना आला.


त्यानंतर बारगजे आणि त्याच्या मित्रांनी प्लॅनिंग केली. आपल्यासोबत आलेल्या व्यक्तीला विश्वासात घेत 'तुमचे अन्य लोकांना पैशांसाठी बोलवा, व्हिडीओ क्लिप डिलिट करुन प्रश्‍न कायमचा मिटवा, तुमचे पैसे देऊन टाकू', असे म्हटल्यानंतर संबंधिताने आपल्या साथीदारांना केजमध्ये बोलवून घेतले. तिघे जण स्कॉर्पिओमध्ये आले. या घटनेची माहिती केज पोलिसांना तत्पूर्वीच देण्यात आली होती. त्यानुसार नितीन बारगजे याच्याकडून खंडणी वसूल करणार्‍या शेखर पाठक याला पोलिसांनी अटक केली.


मित्राच्या मदतीने हनीट्रॅप गँगचा पर्दाफाश
या प्रकरणामध्ये एक आरोपी पोलिसांच्या हाती लागला असून बाकी फरार आहेत. नितीन बारगजे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी कैलास गुजर, प्रशांत श्रीखंडे, योगेश मुटकुळे, वैभव पोकळे, शेखर वेदपाठक, सुरेखा शिंदे, सविता वैद्य यांच्याविरोधात केज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राच्या साहाय्याने नितीन बारगजे यांनी पोलिसांना सगळी माहिती दिल्याने हानीट्रॅपच्या कटाचा पोलिसांनी पर्दाफाश केला.