Nagpur News नागपूर : नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी (Nagpur Bank Scam)  न्यायालयाने दोषी ठरवलेले माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांच्याकडून घोटाळ्याची रक्कम व्याजासकट वसूल करण्यात यावी, या मागणीसाठी आजपासून भाजपच्या (BJP) वतीने अनिश्चित कालीन ठिय्या आंदोलन सुरू होत आहे. सुनील केदार यांना त्यांच्या सावनेर मतदारसंघात घेरण्यासाठीच भाजपच्या वतीने सावनेर शहरातील गांधी चौकावर शेतकऱ्यांसह अनिश्चित कालीन ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.


दरम्यान, या आंदोलनाच्या माध्यमातून भाजप फक्त सुनील केदार यांच्या विरोधात मैदानात उतरत नाही आहे, तर महायुतीत मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांच्यावरही दबाव वाढवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेस नेते सुनील केदारांवरुन महायुतीत खडाजंगी रंगली आहे का? असा सवाल राजकीय वर्तुळातून आता उपस्थित केला जात आहे. 


मित्रपक्षातील सहकार मंत्री भाजपच्या आंदोलनाच्या टार्गेटवर?


नागपूर जिल्हा मध्यवर्ती  बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आणि उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने केदार यांना दिलासा देण्यास नकार दिलाय. त्यानंतर आता सहकार विभागाने घोटाळ्यात बुडालेली बँकेची रक्कम दोषी ठरलेल्या सुनील केदार व इतर आरोपींकडून वसूल करावी, अशी भाजपची मागणी आहे. सहकार विभागाच्या नियमानुसार गेले अनेक वर्ष वसुलीचे हे प्रकरण सहकार मंत्र्यांसमोर सुरू आहे.


मात्र, वसुलीच्या प्रकरणातून सुनील केदार यांना वाचवण्याचे काम राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील करीत असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. वळसे पाटील आणि सुनील केदार हे जुने मित्र आहेत. त्यामुळे दिलीप वळसे पाटील केदार यांच्याकडून वसुली प्रकरणाची सुनावणी हळुवार गतीने चालवत असल्याचा आशिष देशमुख यांचा आरोप आहे.


सुनील केदारांनी होम पिचवर घेरण्याचा भाजप डाव


दरम्यान, या आंदोलनाला स्थानिक राजकारणाची ही किनार असून सुनील केदार आणि आशिष देशमुख हे एकमेकांचे कट्टर राजकीय वैरी आहेत. यापूर्वी 2009च्या विधानसभा निवडणुकीतही दोघे सावनेर मतदार संघातून एकमेकांच्या विरोधात लढले होते. तेव्हा केदारांनी आशिष देशमुख यांचा पराभव केला होता. त्यानंतर काही काळ आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर आशिष देशमुख स्वतःसाठी मतदारसंघाच्या शोधात आहेत आणि त्यांनी पुन्हा एकदा सावनेरवर लक्ष केंद्रित केलं असून त्याच मालिकेत सुनील केदार यांना त्यांच्या होम पिचवर घेरण्याचा भाजप आणि आशिष देशमुख यांचा डाव असल्याचे बोलले जात आहे.


इतर महत्वाच्या बातम्या