Pooja Khedkar: आपल्या अनेक कारनाम्यांमुळे चर्चेत आलेली पूजा खेडकरचे (Pooja Khedkar) अनेक नवे कारनामे समोर येत आहेत. आयएएस होण्यासाठी पूजा खेडकर आणि तिच्या आई-वडिलांनी सात वेगवेगळी नावं धारण केल्याचं युपीएससीच्या चौकशीत समोर आलं आहे. पूजा खेडकरच्या (Pooja Khedkar) अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करताना दिल्ली पोलिसांनी ही माहिती न्यायालयात दिली आहे. त्यामुळे पूजा खेडकर बरोबरच तिच्या आई-वडिलांवरती देखील कारवाई होण्याची शक्यता आहे. 


2012 पासून पूजा खेडकर (Pooja Khedkar) आणि तिचे आई-वडिल वेगवेगळ्या नावांनी वावरत आल्याची माहिती आहे. त्यामुळे यंत्रणेला वेळोवेळी फसवण्यात ते यशस्वी ठरले. या वेगवेगळ्या नावांचा उपयोग पूजा खेडकरने (Pooja Khedkar) यूपीएससीच्या परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी, नॉन क्रिमीलेयर सर्टिफिकेट मिळवण्यासाठी आणि दिव्यांग प्रमाणपत्र मिळवण्यासाठी केला आहे. त्यामुळे यूपीएससी परिक्षा देण्याच्या 9 संधी संपल्यानंतर देखील पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) 12 वेळा नाव बदलून परीक्षा दिल्याची माहिती आहे. 


2012 साली पूजा खेडकरनी (Pooja Khedkar) यूपीएससीची परीक्षा देताना नाव वापरलं होतं ते पूजा खेडकर दिलीपराव आणि त्यांच्या वडिलांचं नाव होतं खेडकर दिलीपराव कोंडिबा. ही परिक्षा देताना त्यांनी दिव्यांग प्रमाणपत्र वापरलं नव्हतं.


2018 मध्ये परिक्षा देताना पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांनी स्वत:च्या देखील नावात बदल केला होता. पूजा दिलीप खेडकर असं स्वत:चं नाव वापरुन परिक्षा दिली होती. त्यासोबतच वडिलांच्या नावात देखील बदल करुन खेडकर दिलीप कोंडिबा असं नाव वापरलं होतं आणि आईचं माहेरचं नाव बुधवंत मनोरमा जगन्नाथ वापरलं होतं. 2018 मध्ये दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं. 


2019 मध्ये परिक्षा देताना पुन्हा नाव बदललं होतं. त्यावेळी खेडकर पुजा दिलीपराव (Pooja Khedkar) केलं होतं. वडिलांचं नाव खेडकर दिलीपराव के. तर आईचं नाव बुधवंत मनोरमा जे. असं वापरलं आहे. यावेळी दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं.


2020 मध्ये परिक्षा देताना खेडकर पुजा दिलीपराव हे नाव वापरलं होतं तर वडिलांच खेडकर दिलीपराव के. वापरलं तर आईचं नाव पुन्हा बदलून बुधवंत मनोरमा जे. करुन परिक्षा दिली होती. यावेळी दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं.


2021 मध्ये तर पुजा खेडकरने परीक्षा देताना थेट आई आणि वडिलांचं एकत्र नाव लिहिलं आहे. ते पुजा मनोरमा दिलीप खेडकर असं आहे. वडिलांचं दिलीप खेडकर तर आईचं माहेरचं नाव मनोरमा बुधवंत वापरलं आहे. 2021 मध्ये दिव्यांग सर्टिफिकेट वापरण्यात आलं होतं आणि यात अंधव्य दाखवण्यात आलं होतं.


2022 मध्ये पुजा मनोरमा दिलीप खेडकर हे नाव वापरलं आणि पुन्हा वडिलांच्या नावात किंचित बदल करुन दिलीप के. खेडकर केलं आणि आईचं नाव मनोरमा बुधवंत केलं आणि यावेळी मात्र मल्टिपल डिसॅबिलीटीचं म्हणजेच PWbD-5 श्रेणीतलं सर्टिफिकेट दाखवलं. 


2023 ला परीक्षा देताना पुजा मनोरमा दिलीप खेडकर, वडिलांचं नाव दिलीप खेडकर आणि मनोरमा बुधवंत नाव वापरलं. यावेळी देखील मल्टिपल डिसॅबिलीटीचं म्हणजेच PWbD-5 श्रेणीतलं सर्टिफिकेट दाखवलं आहे.


कोणतं नाव किती वेळा वापरलं?


यात परीक्षा देताना स्वत: 9 वेळा खेडकर पूजा दिलीपराव हे नाव वापरले. 


3 वेळा पूजा मनोरमा दिलीप खेडकर असे नाव वापरले. 


तसेच वडिलांच्या नावात 7 वेळा खेडकर दिलीपराव कोंडिबा वापरलं. 


2 वेळा खेडकर दिलीप के. वापरलं. 


1 वेळा दिलीप खेडकर वापरलं.


1 वेळा दिलीप के. खेडकर वापरलं.


1 वेळा दिलीप खेडकर असे नमूद केले. 


आईचे नाव 4 वेळा खेडकर मनोरमा दिलीपराव वापरलं.


3 वेळा बुधवंत मनोरमा जगन्नाथ वापरलं. 


2 वेळा बुधवंत मनोरमा वापरलं. 


3 वेळा मनोरमा बुधवंत असा वापर केला.