मुंबई : 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर भाजपने महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेसोबतची 25 वर्षांची युती तोडून भाजपने प्रत्यक्षात 55 उमेदवार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षातून आयात केले. सत्तेत आल्यानंतर यातल्याच काहींनी भाजपला चांगलंच अडचणीत आणलं आहे. तर दुसरीकडे पुन्हा शिवसेनेला गोंजारण्याची वेळ भाजपवर आली आहे.
विद्यमान भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. यापूर्वी राष्ट्रवादीतून तीन वेळा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. 2014 साली त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र अहमदनगरच्या दुहेरी हत्याकांडात खुनाचा कट रचणे आणि एसपी कार्यालय फोडण्याचा गुन्ह्यात त्यांना आज अटक करण्यात आली. यामुळे सत्ताधारी पक्षातल्या आमदाराच्या मुसक्या आवळण्याची वेळ भाजप सरकारवर आली आहे.
फेब्रुवारीत अहमदनगरमध्ये उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एका फोन संभाषणात अपशब्द वापरल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली. मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीपाद छिंदम यांनी या प्रकरणावरुन भाजपची चांगलीच डोकेदुखी वाढवली होती. अखेर छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्याची वेळ भाजपवर आली.
गेल्या वर्षी विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक प्रचारात सैनिकांच्या पत्नींबाबत अपमानजनक वक्तव्य केलं. यामुळे राज्यातच नव्हे तर देशभरात टीकेची झोड उठली. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आणि परिचारक यांना दीड वर्षासाठी निलंबित करण्यात आलं. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात परिचारक यांचं निलंबन मागे घेण्यावरुन शिवसेनेसह विरोधकांनी प्रचंड गदारोळ करुन फोन दिवस सभागृह चालू दिले नाही. यामुळे एकटी पडलेली भाजप चांगलीच तोंडघशी पडली.
यापूर्वी 2014 ला परिचारक स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून विधानसभा लढले होते. 2016 ला अपक्ष म्हणून सर्वपक्षीय मदतीने परिषदेवर निवडून आले. पुढे ते भाजप पुरस्कृत आमदार झाले. तशी त्यांची अजित पवार यांच्यासोबत असलेली जवळीक सर्वश्रुत आहे.
याशिवाय राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेले डॉ. विजय कुमार गावित यांचा आदिवासी घोटाळा असो किंवा मनसेतून आलेले प्रवीण दरेकर यांचा मुंबै बँक घोटाळा, या अशा आयात नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं अधून-मधून चर्चेचा विषय असतात. यामुळे भाजपने आयात नेत्यांच्या जीवावर सत्ता स्थापन जरी केलं असलं तरी याच नेत्यांची वादग्रस्त कारकीर्द भविष्यात भाजप पतनाचं कारण ठरेल का अशी शक्यता निर्माण झाली आहे.
इतर पक्षातील आयात नेत्यांमुळे भाजपच्या अडचणीत वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Apr 2018 03:42 PM (IST)
विद्यमान भाजप आमदार शिवाजी कर्डिले हे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे. यापूर्वी राष्ट्रवादीतून तीन वेळा राहुरी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -