सांगली : सांगलीच्या तासगाव तालुक्यातील वज्रचौडे गावात महिलेने आपल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवऱ्याशी झालेल्या भांडणातून महिलेने हे टोकाचं पाऊल उचललं.
सुनीता सुभाष राठोड असं आत्महत्या केलेल्या महिलेचं नाव असून आशा राठोड, उषा राठोड आणि ऐश्वर्या राठोड असं तिच्या तिन्ही मुलींची नावं आहेत. यापैकी जुळ्या मुली चार वर्षांच्या तर एक मुलगी दोन वर्षाची होती.
हे कुटुंब मूळचं कर्नाटकतील विजापूरमधील असून तासगावात स्टोन क्रशरच्या मशिनरीवर दगड फोडण्याच्या कामासाठी आलं होतं. सुनीताचं तिच्या नवऱ्यासोबत काल (रविवार) किरकोळ कारणावरुन भांडण झालं. यानंतर दुपारी बारा वाजता ती तिन्ही मुलींना घेऊन घराच्या बाहेर पडली होती.
ही घटनेबाबत समजताच तासगाव पोलिस आणि सांगलीची एक बचावपथक घटनास्थळी तात्काळ दाखल झाली. विहिरीतून चारही जणींचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.