BJP OBC Mandal Phase 2: सध्या आपल्या देशाचे राजकारण हे ओबीसी समाजाच्या भोवताल फिरतांना दिसत आहे. संपूर्ण देशात ओबीसींच्या 4 हजार 343 जाती आहे. त्यापैकी महाराष्ट्रात 299 ओबीसींच्या जाती आहे. मात्र महाराष्ट्राचा विचार केला तर आतापर्यंत यातील मोजक्याच ओबीसी (OBC) जातींना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लाभ मिळाल्याचं पाहायला मिळत आहे. 


भाजपने ओबीसींच्या राजकारणाला आता त्यांचा केंद्रबिंदू बनवल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं होतं की, भाजपचा डीएनए हा ओबीसींचा आहे. त्यामुळे भाजपने ओबीसींच्या मुद्द्याला हात घातल्याचं म्हटलं जात आहे. 


भारताचे तत्कालीन पंतप्रधान व्हीपी सिंह यांनी 7 ऑगस्ट 1990 मध्ये मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्यानंतर राज्यात ओबीसी वर्गात असणाऱ्या बहुसंख्य कुणबी, तेली, माळी, साळी, सुतार, कुंभार यांच्यासह मोजक्याच जातींना राजकीय लाभ मिळवता आला. त्यानंतर नोकरी आणि शिक्षणात देखील ओबीसी समाजाला अनेक फायदे मिळू लागले. मात्र ओबीसी समाजात अनेक अशा जाती आहेत ज्या मंडल फेज वनच्या तुलनात्मक लोकसंख्येत अल्प असल्याने त्यांना अनेक राजकीय, शैक्षणिक फायद्यांपासून वंचित आहेत. 


या सर्वाची मूळ सुरुवात झाली ती पंजाब प्रांतातून. पुढे हरियाणा प्रांतात देखील मंडल फेज टू राबण्यात आले. मात्र या सर्वाची खरी आणि योग्य घडी बसवली ती नितीश कुमार यांनी. त्यांनी या जोरावर बिहार राज्यात विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्यानंतर भाजपने हा प्रयोग उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून राबवला. 


भाजपचा ओबीसी संदर्भातला अजेंडा 



  • ओबीसी मंत्रालयाच्या माध्यमातून मंडल फेज टू मध्ये येणाऱ्या जातींनाही शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे.

  • ओबीसींचे रोजगार मेळावे घेताना मंडल फेज टूमध्ये येणाऱ्या जातींच्या तरुणांना आमंत्रित करणे.

  • कौशल्य विकास आणि रोजगार निर्मितीच्या कार्यशाळांचे आयोजन करणे.

  • सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे.

  • पारंपरिक व्यवसायांना बँकेकडून कर्ज उपलब्ध करून देणे. 

  • महाज्योतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेसाठी आर्थिक मदत करणे. 

  • ओबीसी वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यास मदत करणे व्यवसायासाठी जागेची व्यवस्था करुन देणे.

  • स्वाधार योजनेतून वंचितांना शासकीय मदत करणे. 

  • ओबीसी समाजासाठी विशेष घरकुल योजना सुरु करणे. 


ओबीसी समाजात मंडल फेज दोनमध्ये येणाऱ्या जातींची लोकसंख्या ही 50 टक्क्यांच्या जवळपास आहे. महाराष्ट्रात जवळपास 60 टक्के मुसलमान हे ओबीसीमध्ये येतात.  तर कल्याण वसई भागातील काही ख्रिश्चन जातींचा देखील ओबीसीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे मंडल फेज वन जितका महत्वाचा होता तितकाच मंडल फेज टू महत्वाचा असल्याचं म्हटलं जात आहे. म्हणूनच भाजपने त्यांचे मिशन मंडल फेज टू जोमात सुरु केल्याचं चित्र सध्या आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Beed: गोपीनाथ मुंडेसाहेब दिलदार होते; पण त्यांच्या वारसांनी ओबीसी समाजासाठी काय केलं?; हरी नरकेंचा सवाल