Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर शहरात (Chhatrapati Sambhaji Nagar City) एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, पार्टीत गाणे वाजविण्यावरून दोन गटांत चांगलाच राडा झाला. तर वाद एवढ्या टोकाला गेला की, एका गटाने बीडच्या डॉक्टरांवर पिस्तूल ताणून पिस्तुलानेच दोघांचे डोके फोडले. ही घटना 25 जूनच्या रात्री साडेदहा वाजता शहरातील आकाशवाणी चौकातील एका लॉजवर घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक देखील करण्यात आली आहे. तर मॅक्स हबीब अब्दुल शकूर (वय 57 वर्षे, रा. एन- 1, सिडको) आणि जगजितसिंग सुरिंदरसिंग ओबेरॉय (वय 52 वर्षे, रा. ज्योतीनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दीपक सुंदरराव फाटक यांनी पोलिसात तक्रार दिली असून ते डॉक्टर आहे. तसेच त्यांचा बीड जिल्ह्यातील गेवराईत येथे दवाखाना आहे. तर 25 जूनला रात्री साडेदहा वाजता ते मित्र डॉ. एकनाथ पांडुरंग पवार, मनोज सुदामराव टाक, डॉ. जीवन नानासाहेब चव्हाण आदींसह जेवणासाठी लॉजवर गेले होते. त्याच वेळी आरोपी मॅक्स हबीब आणि ओबेरॉय हेदेखील आपल्या मित्रांसह त्याच हॉटेलमध्ये होते. तेथे मराठी गाणे सुरु असल्याने फाटक आणि ओबेरॉय यांच्या गटात वाद झाला. त्यानंतर आरोपी मॅक्स हबीब याने धावत जाऊन डॉ. दीपक फाटक यांच्या डोक्याला पिस्तूल लावले. ट्रिगरवर बोट ठेवून देख लवांगे, मार लवांगे असे म्हणत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पिस्तुलाच्या मुठीने मारून डोके फोडले. डोक्यातून रक्त वाहू लागताच डॉ. एकनाथ पवार यांनी त्याचा हात पकडला. त्यावर आरोपी मॅक्सने पवार यांनाही पिस्तुलाने मारून डोके फोडले.
तर अन्य दोन अनोळखींनी शिवीगाळ करून मारहाण केली. या राड्यानंतर बीडचे डॉक्टर मित्र जवाहरनगर ठाण्यात गेले. तेथून मेडिकल मेमो घेऊन ते उपचारासाठी घाटीत गेले. त्यावरून या प्रकरणी जिन्सी ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास सहायक निरीक्षक अनिल मगर करीत आहेत.
सीसीटीव्ही तपासून घेतले आरोपींना ताब्यात...
पिस्तुलाने डोके फोडल्याची घटना घडल्याचे समजताच पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपास अधिकारी सहायक निरीक्षक अनिल मगरे यांना आरोपींचा शोध घेण्यास सांगितले. आरोपी मॅक्स हबीब आणि ओबेरॉय यांना काही वेळातच अटक केली. आरोपींच्या अटकेनंतर अनेक मोठ-मोठ्या मंडळींनी जिन्सी ठाण्यात हजेरी लावली. मात्र, पोलिसांनी कायद्यानुसार काम करून आरोपींना बेड्या ठोकल्या.
इतर महत्वाच्या बातम्या :