सांगली : भाजपने सांगली-मिरज-कुपवाड महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी हायटेक प्रचार यंत्रणा मैदानात उतरवली आहे. सांगली महापालिका क्षेत्रासाठीच्या विकासाबाबतचे आपले व्हिजन मतदारांसमोर मांडण्यासाठी भाजपने एलईडी स्क्रीन असलेल्या प्रचार रथांचा ताफा सांगली, मिरज, कुपवाडमधील रस्त्यांवर उतरवला आहे.


याशिवाय सांगली महापालिका निवडणुकीत भाजपने प्रचाराच्या काटेकोर नियोजनासाठी वॉररूम देखील तयार केली आहे. महापालिकेच्या प्रचारात उतरणाऱ्या भाजपच्या बड्या नेत्यांच्या सभांचे आणि रोड शोजचे नियोजन करण्याबरोबरच विविध टप्प्यात प्रचाराची दिशा ठरवण्याचे काम या वॉररुममार्फत करण्यात येणार आहे.

फेसबुक, व्हॉट्सअप आणि ट्विटरच्या माध्यमातून सोशल मीडियावरील हायटेक प्रचाराचंही नियोजन भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभांची शक्यता लक्षात घेता त्यादृष्टीने तयारी करण्यात येत आहे. विरोधकांकडून होणाऱ्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठीची यंत्रणाही या वॉररुममध्ये उभारली गेली आहे. तसेच प्रभागनिहाय रोड शो आणि रॅलीजचे वेळापत्रकही ठरवले जात आहे.

आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, माजी आमदार दिनकर पाटील, मकरंद देशपांडे आणि शेखर इनामदार या मान्यवरांच्या उपस्थितीत या प्रचार रथांचे उद्घाटन झाले. या प्रचार रथांच्या माध्यमातून शहराच्या प्रमुख चौकांमध्ये भाजपचा प्रचार केला जाणार आहे.

20 प्रचार रथांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपच्या स्थानिक नेत्यांपर्यंत या मान्यवरांची भाषणे या प्रचार रथांद्वारे प्रसारित केली जाणार आहेत.