टाळ-मृदंग आणि विठ्ठल नामाने पंढरपूर दुमदुमू लागलंय. आषाढीनिमित्त संध्याकाळपर्यंत पालख्या आणि दिंड्या पंढरीत दाखल होणार आहेत. मात्र या भक्तीरसाने गरजणाऱ्या पंढरपुरात मराठा मोर्चाही सुरु आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरासह अनेक शहरांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन पुकारण्यात आलं आहे. पंढरपुरात दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय पूजा होऊ देणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.
मराठा समाजाची इच्छा नसल्यामुळे आपण पूजेला येणार नाही. जे वारकरी पंढरपुरात येतात, त्यांची यात काहीही चूक नाही. जेणेकरुन कोणताही अनुचित प्रकार घडून त्यांना त्रास होऊ नये, यासाठी हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
आषाढी पूजा आणि आंदोलनाचा इतिहास
आषाढी यात्रा काळात आंदोलनाची ही पहिलीच वेळ नाही. या काळात नेहमीच आंदोलक सक्रिय असतात. कारण, या आंदोलनातून राज्याचं लक्ष वेधलं जातं. ही गेल्या अनेक वर्षांपासूनची ही प्रथा आहे. आषाढी यात्रेच्या काळात विविध संघटना आंदोलन करतात. ज्यामुळे यापूर्वीही अनेक नेत्यांना याचा फटका बसला आहे.
राज्यात 1996 साली युतीचं सरकार असताना मनोहर जोशी यांना आषाढीची पूजा रद्द करावी लागली होती. मुंबईतील रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला होता. तेव्हा दलित संघटनांनी मनोहर मोठ्या आंदोलनाची तयारी केली मनोहर जोशींना पूजा न करु देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे यात्रेला गालबोट लागू नये म्हणून मनोहर जोशी यांनी स्वतःच पंढरपूरला न जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा राज्याच्या मुख्य सचिवांनी पूजा केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आणि माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कार्तिकीची पूजा रद्द करावी लागली होती. वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ बंडा तात्या कराडकर यांच्या आंदोलननानंतर आर. आर. पाटलांनी पूजेला जाणं रद्द केलं. तेव्हाच्या वारकरी प्रश्नावर आंदोलन सुरु करण्यात आलं होतं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुष्काळात धरणासंदर्भात केलेल्या वक्तव्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. तेव्हा सर्वांनी त्यांच्या हस्ते होणाऱ्या कार्तिकीच्या पूजेला विरोध केला होता. त्यामुळे अजित पवार यांच्या हस्ते होणारी पूजा रद्द करण्यात आली आणि जिल्ह्यातले नेते दिलीप सोपल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही बंडा तात्या कराडकर यांनी अडवलं होतं. पंढरपुरातल्या शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला आणि आश्वासन घेतलं होतं. त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी पूजा केली.
दरम्यान, 25 वर्षांपूर्वी गजानन महाराज संस्थानचा हत्ती उधळला अशी अफवा पसरली आणि चेंगराचेंगरी झाली होती. या अफवेने झालेल्या चेंगराचेंगरीत दहा वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. त्यामुळे प्रत्येकानेच कोणतीही संभ्रमाची परिस्थिती निर्माण होईल, असं कृत्य न करण्याची गरज आहे.