सोलापूर : एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीवर तोंडसुख घेतात तर दुसरीकडे राज्यातले त्यांचेच सहकारी मंत्री राष्ट्रवादीशी हातमिळवणी करतात. त्यामुळे भाजपचे दाखवायचे आणि खायचे दात वेगळे आहेत का? असा संभ्रम जनतेच्या मनात निर्माण झाला आहे.

सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या पुढाकाराने सोलापुरात भाजप-राष्ट्रवादी अशी अभद्र युती उदयाला आली आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका भाजप-राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून लढवत आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीची युती झाली आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात उमेदवार उभा करणार नाही. भाजप-राष्ट्रवादीच्या राज्यातल्या नेत्यांची तोंड विरुद्ध दिशेला असली तरी सोलापुरात मात्र दोन्ही पक्षाचे झेंडे मोठ्या दिमाखात फडकत आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील दोन जिल्हा परिषदा आणि चार पंचायत समितीच्या जागांवर भाजप-राष्ट्रवादी मिळून लढणार आहे. राज्यात एकमेकांच्या अंगावर जाहीरपणे चिखलफेक करणारे दोन्ही पक्ष हातात हात घालून निवडणूक लढवणार आहेत. वैचारिक बैठक वेगळी असली तरी निवडणुका जिंकण्यासाठी ही युती केल्याचा दावा भाजप नेते करतायत.

मोठ्या थाटामाटात या अभद्र युतीच्या प्रचाराचा सोहळा पार पडला. भाजप-राष्ट्रवादीच्या या युतीचं दस्तुरखुद्द सोलापूरच्या खासदारांनाही कौतुक वाटलं. त्याची कबुलीही त्यांनी जाहीरपणे दिली.

या युतीचे शिल्पकार आहेत राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख. देशमुखांनी अस्तित्वात आणलेल्या या अभद्र युतीचा प्रचारही तेवढ्याच थाटात सुरु झालाय. एकीकडे मुख्यमंत्री राष्ट्रवादीवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. राष्ट्रवादीला भ्रष्ट आणि कन्फ्युजड पक्ष असल्याची टिका फडणवीस करत असताना सहकार मंत्र्यांनी मात्र राष्ट्रवादीशी मैत्री केलीय.

राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही म्हणतात ते यालाच. ही अशक्य वाटणारी युती केवळ स्थानिकांच्या मार्जीवरून अस्तित्वात आलेली नाहीय. वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीनेच युती केल्याचा दावा उभय बाजूने केला जातोय. शरद पवारांचं मध्यावधीच भाकीत खर ठरलंच तर राष्ट्रवादीच्या पाठींब्यावर राज्य सरकार चालण्याची ही नांदी तर नसेल?