नवी मुंबई : नवी मुंबईत पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या कैद्याच्या प्रकरणामागील खरी मेख समोर आली आहे. बायकोसोबत डेटवर जाण्यासाठीच कैदी प्रेम उर्फ हनुमंत सदाशिव पाटीलने पोलिसांना 40 हजार रुपयांची लाच दिली होती, अशी धक्कादायक माहिती आहे. 'मिड डे' वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे.


मुंबईतील जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेलं असता प्रेमने पोबारा केल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं. मात्र बायकोसोबत दक्षिण मुंबईतल्या एका हॉटेलात वेळ घालवता यावा, यासाठी त्याने पोलिसांनाच लाच दिली. त्याची पत्नी मनाली हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर त्याची वाट पाहत होती.

साध्या वेशातील दोन पोलिस हॉटेलबाहेर, तर एक पोलिस रुमबाहेर उभा राहिला. पलायनाची हीच संधी असल्याचं ओळखून, पोलिसांना चुकवून प्रेमने खिडकीतून पळ काढला. कैदी पसार झाल्याचं लक्षात येताच तिघा पोलिसांनी खोटी कहाणी रचली. वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात नेलं असताना, त्याने पलायन केल्याची त्या तिघांनी थाप मारली.

तळोजा जेलमधील मोक्का प्रकरणातील आरोपी फरार


वरिष्ठ पोलिसांनी सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर हा बनाव उघड झाला. त्यानंतर तिघांची वैयक्तिक उलटतपासणी घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी खरा प्रकार सांगितला. पोलिसांनीच हॉटेलची रुम बूक केल्याचं, इतकंच नाही तर आदल्या दिवशी प्रेमची पत्नी मनालीला फोन करुन सांगितल्याचंही समोर आलं.

या प्रकरणी नवी मुंबई पोलिसातील तुरुंग प्रशासनाच्या 10 पोलिसांचं निलंबन करण्यात आलं आहे. तिघा पोलिसांनी हॉटेलपर्यंत त्याची सोबत केल्याचंही म्हटलं जात आहे. तिघांवर गुन्हेगारी स्वरूपाचं दुर्लक्ष केल्याचा, तर उर्वरित सात जणांवर त्याच्या अनुपस्थितीची नोंद न केल्याचा ठपका ठेवण्यात येत आहे.

प्रेम पाटीलला अपहरण, हत्येच्या गुन्हासारख्या विविध गुन्ह्यांखाली मोक्का अंतर्गत अटक झाली होती. पनवेल पोलिसांनी कामोठेमधून अटक केल्यानंतर त्याची रवानगी तळोजा जेलमध्ये करण्यात आली होती.