मुंबई : अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा होणार नाही, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली. तसंच युजीसीच्या निर्देशांनुसारच सगळे निर्णय घेतल्याचं त्यांनी सांगितलं. "अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवर पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय "घेण्यात आला आहे. यामध्ये पूर्वीच्या वर्षाचा परफॉर्मन्स 50 टक्के गृहीत धरलं जाईल आणि सध्याचा परफॉर्मन्स 50 टक्के ग्राह्य धरला जाईल. त्यानुसार ग्रेड दिले जातील आणि पुढच्या वर्गात पाठवलं जाईल," असं उदय सामंत यांनी सांगितलं.


ज्याला परफॉर्मन्सवर दिलेले ग्रेड कमी वाटत असतील त्याला पुढच्या वर्गात गेल्यावर ऐच्छिक परीक्षा देत येणार आहे. त्याचं वेळापत्रक विद्यापीठ ठरवेल, अशी माहितीही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. "जे विद्यार्थी ग्रेडिंग देताना नापास झाले आहेत, त्यांचे नेमकं काय करायचं हा प्रश्न सुद्धा आहे. त्यामुळे जे विद्यार्थी ग्रेडिंगमध्ये नापास होतील, त्या विषयाच्या परीक्षा पुढच्या वर्षात प्रवेश देऊन घेतल्या जातील. विद्यापीठ याबाबतचं वेळापत्रक जाहीर करेल," असं त्यांनी सांगितलं.


एटीकेटीच्या परीक्षा 120 दिवसांच्या आत!
"एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश दिला जाईल. मात्र प्रवेश दिल्यानंतर ज्या विषयाच्या एटीकेटी लागलेल्या आहेत त्या विषयाच्या परीक्षा 120 दिवसाच्या आत घेतल्या जातील," असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं.


....तर पुन्हा बैठक घेऊन निर्णय!
"अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या 1 जुलै ते 30 जुलै दरम्यान घ्याव्या लागतील. मात्र, दुर्दैवाने जर लॉकडाऊन सुरु राहिला तर 20 ते 25 जून दरम्यान पुन्हा एकदा समिती आणि सरकार याबाबत बैठक घेऊन निर्णय घेईल," असंही उदय सामंत यांनी सांगितलं.


सोशल डिन्सन्सिंग ठेवूनच परीक्षा
"बीए, बीकॉम, बीएससी, बीबीए, इंजिनियर, आर्किटेक्टचर, एमसीए, डिप्लोमा, एमए, एमकॉम, एमएस्सी यासारख्या सर्व परीक्षांच्या अंतिम वर्षच्या शेवटच्या सत्राची परीक्षा घेतल्या जाणार आहेत. सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच परीक्षा होणार आहेत. प्रॅक्टिकल घेता आले नाही तर जर्नल सबमिशन केलेले आहेत. ऑनलाईन तोंडी परीक्षा घेतली जाईल. अशा पद्धतीने प्रॅक्टिकल घेऊ," असं उदय सांमत म्हणाले.


सीईटी परीक्षेबाबत येत्या आठ दिवसात योग्य तो निर्णय घेऊ असं उदय सामंत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "यूजीच्या सीईटी 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान परीक्षा आणि पीजीच्या सीईटी परीक्षा 23 जुलै ते 30 जुलै याचं नियोजन आम्ही सध्या करत आहोत."