6th August In History: इतिहासात आजच्या दिवशी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. आजच्या दिवशी जगात पहिल्या अणुबॉम्बचा वापर करण्यात आला होता. जपानची राजधानी हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबॉम्ब टाकला, यामुळे असंख्य लोक मृत्यूमुखी पडले. भारतातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म देखील आजच्याच दिवशी झाला होता. तर दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन आजच्या दिवशीच झालं. या व्यतिरिक्त आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घटना दिनविशेषच्या माध्यमातून जाणून घेऊया.


6 ऑगस्ट : हिरोशिमा दिन (Hiroshima Day)


हिरोशिमा ही जपान देशाच्या हिरोशिमा प्रांताची राजधानी आणि चुगोकू प्रदेशामधील सर्वात मोठं शहर. 6 ऑगस्ट 1945 साली अमेरिकेने हिरोशिमा या शहरावर अणुबाँब टाकला. जगात पहिल्या अणुबाँबचा वापर करण्यात आला होता, ज्यामध्ये हिरोशिमा प्रांताची मोठी हानी झाली. अणुबॉम्बचा स्फोट झाल्यानंतर हिरोशिमामध्ये 13 चौरस किलोमीटरच्या प्रदेशात विध्वंस झाल्याचं सांगितलं जातं. यात 70,000 जण तात्काळ मृत्यूमुखी पडले, तर पुढील अनेक वर्षे लोकांवर किरणोत्सर्गाचा परिणाम झाला. 


1986: भारतातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म


आजच्या दिवशी भारतातील पहिल्या टेस्ट ट्युब बेबीचा जन्म झाला. हर्षा चावडा हिच्या रूपाने भारतातील पहिल्या टेस्ट ट्यूब बेबीने जन्म घेतला. प्रसूतिशास्त्रातील मैलाचा दगड ठरलेल्या ‘इन व्हायट्रो फर्र्टिलायझेशन’ तंत्राचा वापर करून डॉ. इंदिरा आहुजा यांनी हर्षाला जन्म दिला. तेव्हापासून आजतागायत भारतात या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 5 हजारांहून अधिक टेस्ट ट्युब बाळांना जन्म देण्यात आला आहे.


2019: दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांचं निधन. (जन्म: 14 फेब्रुवारी 1952)


देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं 2019 साली आकस्मिक निधन झालं. वयाच्या 67व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुषमा स्वराज यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हृदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला, त्या बऱ्याच काळापासून आजारी होत्या. त्यांचं किडनी ट्रान्सप्लांटही झालं होतं. सुषमा स्वराज सर्वप्रथम 1990 मध्ये राज्यसभेवर निवडून आल्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांना परराष्ट्र मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे सांभाळली. सुषमा स्वराज यांच्या निधनाने एका मितभाषी आणि तितक्याच कणखर नेतृत्वाला देश मुकला.


यासह आजच्या दिवसातील इतर महत्त्वाच्या घटना कोणत्या आहेत त्या पाहू, 


1900: टेक्सास इन्स्ट्रूमेंट्स कंपनीचे सहसंस्थापक सीसिल हॉवर्ड ग्रीन यांचा जन्म. (मृत्यू: 11 एप्रिल 2003)


1914: पहिले महायुद्ध - सर्बियाने जर्मनीविरुद्ध तर ऑस्ट्रियाने रशियाविरुद्ध युद्ध पुकारलं.


1925: लेखिका योगिनी जोगळेकर यांचा जन्म. (मृत्यू: 1 नोव्हेंबर 2005)


1925: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे  सहसंस्थापक , राष्ट्रगुरू सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांचं निधन. (जन्म: 10 नोव्हेंबर 1848)


1926: जेरट्रूड एडर्ले ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली महिला बनली.


1945: जपानमधील हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँब टाकला. इतिहासात पहिल्यांदा अणुबाँबचा वापर करण्यात आला.


1952: राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना.


1962: जमैकाला इंग्लंडपासून स्वातंत्र्य मिळालं.


1965: भारतीय चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांचा जन्म.


1970: भारतीय वंशाचे अमेरिकन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक एम. नाईट श्यामलन यांचा जन्म.


2010: भारतातील जम्मू आणि काश्मीर भागात भयानक पूर आला.